भिवंडी: शहरातील दोन मंदिरात एका रात्रीत मंदिरातील घंटा, दानपेटी चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या तीन तासात आरोपीस जेरबंद करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी मंगळवारी दिली आहे. सुभाषनगर परिसरातील हनुमान मंदीर तसेच अग्नीमाता मंदीर या दोन्ही मंदीरात सोमवारी रात्री हनुमान मंदीराचे भिंतीवरून मंदिरात तसेच लगतच्या अग्नीमाता मंदीरात प्रवेश करून दोन्ही मंदीरामधील पितळी धातुच्या घंटा, पितळी नाग प्रतिकृती तसेच दानपेटी व इतर वस्तू असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. हनुमान मंदीराचे पुजारी आनंद रमेशचंद्र शुक्ला यांनी या बाबत शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या घटनेचे गांभीर्य पाहता शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे, पोलिस हवालदार संतोष पवार, पोलिस नाईक श्रीकांत पाटील, किरण जाधव, रविंद्र पाटील, नरसिंह क्षीरसागर, रोशन जाधव यांनी तपास सुरू केला असता गुप्त बातमीदारा कडून संशयित चोरट्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावुन जब्बार कंपाऊंड या परिसरातून मोहमद साकीब उर्फ सलमान अख्तर अंसारी वय २२ वर्षे यास ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत मंदिरातून चोरी केलेले सर्व १ लाख ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनतर गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासात शांतीनगर पोलिसांनी आरोपीस शिताफीने अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.