ठाणे - मुंबईला जाणाऱ्या स्लो ट्रेनने दिवा सोडले आणि अचानक दरवाजाजवळ उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये बाचाबाची सुरू झाली. एक दरवाजात आणि दुसरा दाराशेजारी टेकून उभा होता. परस्परांना धक्का लागल्याने खेटून उभे राहिल्याने त्यांच्यात हिंदी भाषेतून भांडण सुरू झाले. पण ते वाढल्यावर दोघांनाही भांडण्यासाठी शब्द पुरेनात. मग दोघेही मातृभाषेवर आले.
दोघेही मराठी असल्याचे लक्षात येताच लगेच त्यांनी समजुतीने घेतले. जरा नीट उभे राहा, दुपारी ऊन असते, घामाचा वास येतो, असे म्हणत भांडणाचा स्वर एकदम खाली आला. ते पाहून बाजूच्यांपैकी एकाने संधी घेत गुगली टाकली. अरे, मराठी आहात ना? मग नीट खेटून उभे राहा. मराठी माणसाला घाम येत नाही..ते ऐकताच बाकीचे प्रवासी तर हसलेच, पण भांडणारेही त्यात सामील झाले.