मीरारोड - एटीएम मधून पैसे काढण्यास अनोळखी व्यक्तीची मदत घेणे भाईंदरच्या महिलेस भारी पडले. भामट्यानी पिन पाहून घेत हातचलाखीने कार्ड बदलून २५ हजारांचा गंडा घातला.
भाईंदर पश्चिमच्या देवचंद नगरमध्ये राहणाऱ्या ५२ वर्षीय संगिता किशोर जैन ह्या पैसे काढण्यासाठी पंजाब नेशनल बँक शाखेच्या एटीएम मध्ये गेल्या होत्या. एटीएम मधुन पैसे येत नव्हते त्यावेळी तेथे असलेला अनोळखी व्यक्तीने हिंदीत, बहनजी मै तुमको पैसा निकालने के लिये मदत करु क्या.. ? असे म्हणाला. जैन यांनी पुन्हा कार्ड टाकुन पिन टाकला असता तो माणूस हळूहळू पिन नंबर टाका म्हणाला. तेव्हा जैन यांनी पुन्हा पिन टाकला. तोच मागे असलेल्या दुसऱ्या माणसाने जैन यांना बाजूला होण्यास सांगून हातचालाखीने त्याच्या जवळील कार्ड एटीएम मशीनमध्ये टाकून जैन यांचे कार्ड काढून घेतले व जैन यांना तुमचे कार्ड काढून घ्या सांगून दोघेही निघून गेले.
जैन यांनी कार्ड काढले असता ते त्यांच्या बँकेचे नसल्याचे लक्षात आले. लगत असलेल्या बँकेत त्या धावल्या व व्यवस्थापकास कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले. परंतु तो पर्यंत त्यांच्या एटीएम कार्ड द्वारे भामट्यानी २५ हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी शुक्रवारी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.