अंबरनाथ: उन्हाचा तडाखा वाढल्याने अनेक तरुण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी धरण पात्रात येत आहे. अंबरनाथच्या चिखलोली धरणात उल्हासनगरच्या तरुणाचा तर जीआयपी टॅंक धरणात कल्याणच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला.
उल्हासनगर येथे राहणारा रोहित कामसिंग (17) हा आपल्या मित्रांसह पिकनिकसाठी अंबरनाथच्या चिखलोली धरण पात्रात आला होता. तो आपला मित्रांसह पोहण्यासाठी धरणात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला त्याच्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी रोहित याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह न सापडल्याने आज पुन्हा सकाळी शोध मोहीम राबवण्यात आली आणि सकाळी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तर गुरुवारी कल्याणच्या काटेमानेवली परिसरात राहणारा केतन ठाकूर हा देखील जीआयपी टॅंक परिसरात आला होता. त्याला देखील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. गेल्याच आठवड्यात अंबरनाथ तालुक्यातील बारवी नदीपत्रात बुडून तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेच पुन्हा दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याने उन्हाळी पिकनिक किती जीव घेणे ठरू लागली आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे.