ठाणे : रक्षाबंधन सण ३० ऑगस्टलाच दिवसभर साजरा करायचा आहे. जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तो भद्रा करण असताना केला जात नाही. त्या दिवशी सकाळी १०.५८ ते रात्री ९.०२ भद्रा करण आहे.
महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असा मेसेज व्हायरल होत आहे त्यात काहीही तथ्य नाही, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यानी सांगितले.
दरम्यान, बुधवारी आपल्याला सुपर-ब्लूमूनचे दर्शन होणार आहे. यानंतर पुढच्या वर्षी २०२४ मध्ये १८ सप्टेंबरला सुपर मूनचे दर्शन होणार आहे, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. ज्या इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येतात, त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यू मून’ म्हणतात, असे त्यांनी सांगितले.
सुपर-ब्ल्यू मूनचे हाेणार दर्शनबुधवार ३० ऑगस्ट रोजी रात्री आपणास सुपर-ब्ल्यू मूनचे दर्शन होणार आहे. त्यादिवशी सायं. ६:४० वा. चंद्र पूर्वेला उगवेल. उत्तररात्री ५:१९ वा. पश्चिमेला मावळेल. तसेच, चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५७ हजार १८२ किलोमीटर अंतरावर येणार आहे. आकाश निरभ्र असेल, तर बुधवारी ३० ऑगस्ट रोजी रात्रभर आकाशात सुपर ब्ल्यूमूनचे साध्या डोळ्यांनी दर्शन घेता येणार आहे.