मेघनाथ विशे
पडघा : भिवंडी तालुक्यातील पडघ्यालगत असलेले बोरीवली हे मुस्लीमबहुल गाव म्हणून ओळखले जाते. गावाच्या एका बाजूला समतानगर ही दलित वस्ती तर दुसऱ्या बाजूला आनंदनगर ही आदिवासीवाडी आहे. हा भाग सोडला तर सहा ते सात हजार लोकवस्ती असलेले हे गाव पूर्णपणे मुस्लीम लोकवस्तीचे आहे. शनिवारी पहाटे एनआयएने छापा टाकून येथील १५ जणांना देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून ताब्यात घेतले. त्यात साकिब नाचनचाही समावेश आहे. बोरीवली गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
साकिबवर यापूर्वीही विलेपार्ले, घाटकोपर, मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी तसेच तालुक्यातील अन्य तीन जणांच्या हत्येचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर मूळचा लाकूड व्यावसायिक म्हणून परिचित असलेला तसेच बोरीवली गावचा उपसरपंच फरहान सुसे यालाही ताब्यात घेतले आहे. पडघा परिसरात बांधकाम व्यावसायिक म्हणून परिचित असलेला सैफ नाचन व रेहान सुसे हेही एनआयए ताब्यात आहेत. ताब्यात घेतलेले सर्व १५ जण सधन कुटुंबातील असून त्यांची पडघा परिसरात वडिलोपार्जित, अशी मोठी शेतजमीन आहे.
बोरीवली गावातून फेरफटका मारून यासंदर्भात काही
स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता अटक झालेल्यांपैकी अनेकांना नाहक या प्रकरणात गुंतवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मात्र, कोणीही उघडपणे बोलण्यास तयार होत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव रविवारी बोरीवली व पडघा परिसरात काही प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आरोपींना नेले पतियाळाला?
एनआयएची टीम शनिवारी पहाटे पडघ्यात दाखल होताच येथील स्थानिक पोलिस ठाण्याला संबंधित संशयित आरोपींना ताब्यात घेत असल्याचे लेखी स्वरूपाचे पत्र दिले होते. यानंतर या टीमने बाहेरून आणलेली पोलिस कुमक तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने बोरीवली गावात छापे टाकून १५ जणांना ताब्यात घेतले. यावेळी काही आरोपींच्या घरातून रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली. या सर्व आरोपींना एका खासगी विमानाने पतियाळा येथे हलवले असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते.