भिवंडी: भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील कैलास नगर वर्धमान कंपाउंड मधील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली आहे. इमारतीच्या ढिगार्याखाली ५० ते ६० नागरिक अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीत खाली वाणिज्य वापराचे गाळे व वरती नागरिक राहत होते. घटनास्थळी अग्निशमन दल रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.
मिळालेली माहिती अशी, इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत नऊ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास भिवंडीतील वालपाडा येथील वर्धमान भवन नावाची तीन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीखाली गोदामही होते.
इमारतीच्या वरच्या तीन मजल्यावर लोक राहत होते. घटनेच्या वेळी या गोडाऊनमध्ये ३० ते ३५ जण काम करत होते. दुपारी अचानक इमारत कोसळल्याने कामगारांसह इमारतीत राहणारे एकूण ७० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह मदत व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि अतिशय काळजीपूर्वक ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. इमारतीच्या गोदामात काम करणाऱ्या एका मजुराने माध्यमांना सांगितले की, आमच्यापैकी काहीजण जेवणासाठी गोडाऊनमध्ये थांबले होते. त्यानंतर अचानक इमारत कोसळल्याचा आवाज आला आणि आम्ही गोदामातून धावत सुटलो त्यामुळे आम्ही वाचलो, तर आमचे अनेक सहकारी मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
१) सोनाली परमेश्वर कांबळे -वय-२२ वर्ष, २) शिवकुमार कांबळे वय २६ वर्ष ३) मुक्तार रोशन मंसुरी वय २६ वर्ष ४) चिकू रोहित सिंग वय - ५ वर्ष, ५) प्रिन्स रोहित सिंग व ३ वर्ष ६) विकासकुमार मुकेश रावय - १८ वर्ष ७) उदयभान मुनिराम यादव- वय २५ वर्ष ८) अनिता वय ३० वर्ष यांची सुखरूप सुटका केलेली आहे त्यात अनुक्रमांक ३ ते ८ यांस उपचारा कामी IGM हॉस्पीटल भिवंडी येथे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच १) नवनाथ सावंत वय ३५ वर्ष हे मयत झालेले आहेत.