मीरारोड - एका दिवसात पैसे दुप्पट होण्याच्या लोभाने भाईंदर मधील एका व्यापाऱ्याने स्वतःचे तीस लाख रुपये गमावल्याचे घटना घडली आहे भाईंदर पोलिसांनी एकास अटक केली आहे.
भाईंदर पश्चिमेस राहणारे रवि कांतीलाल मेहता ( ४५ ) हे जमीन खरेदी विक्री व स्टीलचा व्यवसाय करतात. जमीन खरेदी विक्री व्यवसायात जमीनीच्या कागदपत्रांचे काम भुषण मांडवकर करतो. भूषण याने मेहतांना त्यांच्या मित्राने आणलेल्या योजनेची माहिती दिली. ५ लाख रुपये भरल्यास ते एक "पे बाय नियर वॉलेट" नावाचे स्पेन देशाचे वॉलेट उघडून त्यात गुंतवणूक केली जाते. त्यामध्ये नंतर रोखीने २५ लाख भरावे लागतात. ती रक्कम भरल्यास दुसऱ्या दिवशी ५४ लाख रुपये मिळतात अशी योजनेची माहिती भूषण याने मेहतांना दिली. भूषणच्या सांगण्या नुसार मेहतांनी करण व राहुल यांना ५ लाख रुपये दिले. दोघांनी मेहता यांचे वॉलेट अकाऊंट उघडल्या नंतर मेहता यांच्या त्या वॉलेट खात्यात साडे तीन लाख रुपये जमा झाले.
झटपट भरपूर पैसे मिळत असल्याचे पाहून मेहतांनी त्या दोघांना रोखीने २५ लाख रुपये दिले. दोन दिवसात पैसे खात्यात येतील असे त्यांनी सांगितले. मात्र पैसे न आल्याने मेहतांनी करण व राहुल यांना विचारणा केली असता दोघांनी चालढकल सुरू केली. त्यांनी बनावट ईमेल आयडी बनवून त्याद्वारे मेहतांना खोटे स्टेटमेंट पाठवत व पैसे मिळतील असे सांगत होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मेहतांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिसांनी करण रजोरा याला अटक केली असून राहुल गायकवाड याचा शोध सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले.