अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : घोडबंदर रोड वरील तत्त्वज्ञान विद्यापीठच्या बाजूला रस्त्यावरील झाडाला भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने धडक दिली. तो झाड ट्रकच्या जवळून जाणाऱ्या एसटी बसवर कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी त्या झाडाचा बळी गेल्याचे घटनास्थळी पाहण्यास मिळून आले. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वासात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रक चालक या धडकेनंतर तेथून पळून गेल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
ठाण्याकडून घोडबंदरकडे चाललेल्या या ट्रकने रस्त्यावरील बदामाच्या झाडाला धडक दिली. या धडकेत तो झाड ट्रकच्या जवळून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्नाळा डेपोच्या बसवर पडला. ही बस ठाण्याकडून विरारला निघाली होती. ही बाब दक्ष नागरिक भोया यांनी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. तातडीने घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. मात्र घटनास्थळी महापालिका पथक पोहोचण्यापूर्वी झाडाला धडक देणारा ट्रक व बस घटनास्थळावरून निघून गेले. तसेच पडलेले झाड दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कापून बाजूला करण्यात आले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.