मीरारोड - येणाऱ्या २०४७ साला पर्यंत मीरा भाईंदर शहर कसे असावे ह्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेकडून मीराभाईंदर@२०४७ परिषदेचे आयोजन ९ आणि १० फेब्रुवारी रोजी करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी बुधवारी दिली .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत @२०४७ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेची भविष्यातील वाटचाल - ओळख आदी उद्देशाने ह्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . काशीमीरा येथील भारतरत्न गानसमाज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात हि दोन दिवसीय परिषद होणार आहे . ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. परिषदेचे उदघाटन होईल . कोकण विभागीय अतिरिक्त आयुक्त विकास पानसरे, एमएमआरडीए आयुक्त सतिशकुमार खडके, वसई विरारचे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार , मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर आदी उपस्थित राहणार आहेत .
पहिल्या सत्रात महिला सबलीकरण या विषयावर लेखक - दिग्दर्शक अरविंद जगताप हे परुषांच्या नजरेतून महिला सक्षमीकरण या विषयावर संवाद साधतील. व्हीआयएन मॅनेजमेंट कन्सल्टंट च्या अध्यक्ष डॉ. विजया शेट्टी महिलांसाठी डिजिटल सबलीकरण तर ग्लोबल ब्रँड बिल्डिंग कन्सलटंट आणि बूकवाला एनजीओच्या सदस्य प्रीथी मारोली या नेतृत्व करणाऱ्या महिलांची भूमिका या विषयांवर बोलणार आहेत . दुसऱ्या सत्रात टेडएक्सचे तरूनसिंग चौहान हे शाश्वत शहर ब्रँडिंग या विषयावर मार्गदर्शन करतील निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन हे सुरक्षित शहर यावर बोलणार आहेत .
१० फेब्रुवारीला पहिल्या सत्रात भारत सरकारचे माजी सचिव आणि राजदूत असलेले डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे पर्यावरण आणि युवक या विषयावर विचार मांडतील . दुपारच्या सत्रात शिक्षणतज्ञ फ्रान्सिस जोसेफ हे शैक्षणिक धोरण आणि सुधारणा व शिक्षणावरील तंत्रज्ञानाचा प्रभाव या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत . एमजीएम विद्यापीठाचे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा शिक्षणतज्ञ सुधीर गव्हाणे हे तंत्रज्ञानाचा शिक्षणावरील प्रभाव या विषयावर मार्गदर्शन करतील.
तिसऱ्या सत्रात नवजात बालरोग तज्ञ, लेखक, वक्ते डॉ. अमोल अन्नदाते हे शाळेवर आधारित आरोग्य शिक्षण कार्यक्रमाची परिणामकारकता या विषयावर मार्गदर्शन करतील. सायंकाळी समारोप प्रसंगी नगरविकासचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंद राज, मीरा भाईंदर - वसई विरार अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक आदू उपस्थित राहणार असल्याचे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयुक्त काटकर यांनी दिली .