ठाणे - होळीतील बीभत्स प्रकार नकोसे झाल्याने अनेक जण हल्ली धुलिवंदन खेळत नाहीत. अशावेळी एक पर्यावरण स्नेही, कलात्मक व सर्व कुटुंबाला एकत्र साजरा करता येणारा उत्सव “एक अनोखी होळी” पाच वर्षापूर्वी छोट्या प्रमाणात ठाण्यात सुरु झाला. चेहरे रंगविणे, ड्रम सर्कल या सोबत गायन, वादन, नृत्य, हास्यकविता, स्टँड अप असे कार्यक्रम जोडले जाऊन रंगारंग होळी व धुलिवंदन उत्साही वातावरणात साजरे केला जाणार आहे.
सोमवार २५ मार्च रोजी, कचराळी तलाव खुला रंगमंच, महापालिका मुख्यालयासमोर, पाचपाखाडी ठाणे येथे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळातहा अनोखा होलीकोत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने स्वत्वचे कलाकार लोकांचे चेहरे कलात्मक पद्धतीने रंगवून देणार आहेत. दुसऱ्या वर्षी या उपक्रमाला स्वत्व ठाणे ड्रम सर्कलचे वादक जोडले गेले. त्याच्या तालावर थिरकत लोक रंगून जाऊ लागले. कोवीड काळातही आपापल्या घरात कलात्मक चेहरे रंगवून रीलच्या द्वारे शेअर करीत अनोखी होळी साजरी केली.
मागील वर्षी तब्बल एक हजारांच्यावर ठाणेकरांनी या अनोख्या होळीमध्ये सहभागी होत आपले चेहरे रंगवून घेतले. यंदा स्वत्वचा हा उपक्रम उत्सव ठाणे निमित्ताने जोडल्या गेलेल्या अनेक संस्था व कलाकार यांना सोबत घेऊन साजरा करण्याचा संस्थेचा मानस आहे. यात कार्यक्रम सादर करण्याची इच्छा असल्यास utsavthane24@gmail.com इथे ईमेल करावा असे आवाहन केले.
अगदी सुरुवातीला आम्ही काही जण उपवन तलावावर जाऊन आपसात चेहेरे रंगवीत होतो आणि त्यावेळी आजूबाजूला असलेल्या लोकांनी आम्हाला त्यांचेही चेहरे रंगवाल का असे विचारले आम्ही रंगवून दिले ते होते २०१८ चे वर्ष यातूनच “एक अनोखी होळी” या संकल्पनेचा जन्म झाला असे पहिल्या वर्षापासून सहभागी होणारे कलाकार निलेश शिनालकर व मनोज मुसळे यांनी सांगितले. एकदा सुंदर कलात्मक चेहरा रंगविला आणि त्याचा सेल्फी समाजमाध्यमावर टाकला आणि आम्हाला पण पुढच्या वर्षी नक्की घेऊन जा असे म्हणत अनेक जण प्रतिवर्षी या उपक्रमाला जोडले जात आहेत असे राजन चौगुले यांनी सांगितले. मी इथे दर वर्षी साधारण २५ ते ३० जणांच्या चेहऱ्यावर रंगवून देते असे दरवर्षी सहकुटुंब येऊन पूर्ण वेळ काम करणारी कलाकार अक्षया शिदिड हिने सांगितले.