ठाणे: एका डंपरने मोटारसायकलीला दिलेल्या धडकेमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचचे पोलिस हवालदार सुनिल रावते (४५, रा. सावरकरनगर, ठाणे) आणि दुचाकीवर त्यांच्या सोबत जाणारी मिमा रामपूरकर (४०, रा. विटावा, ठाणे) या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. रावते यांच्या घटनेने ठाणे पोलिस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
रावते हे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील सावरकरनगर भागात वास्तव्याला आहेत. त्यांनी वसंतविहार परिसरात नविन घर खरेदी केले होते. याच घराच्या रजिस्ट्रेशनसाठी ते सकाळी घरातून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. निबंधक कार्यालयात घराची नोंदणी करण्याचे सहाय्य करणाºया मिमा रामपूरकर या महिलेसह ते त्यांच्या मोटारसायकलीवरुन जात वर्तकनगरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला कोरस टॉवरजवळ भरघाव वेगाने आलेल्या एका डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये रावते आणि त्यांच्या सोबत असलेली महिला दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दोघांचेही मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अपघाताला कारणीभूत असलेल्या डंपर चालकाविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावते यांच्या मागे पत्नी, १७ वर्षांचा मुलगा आणि दहा वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ठाणे शहर पोलिस दलात २०१४ मध्ये पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेले रावते हे सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचमध्ये कार्यरत होते. यापूर्वी ते पोलिस मुख्यालय, नौपाडा विभागाचे सहायक आयुक्त कार्यालयात नेमणूकीला होते. गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी गुन्हे उघड करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनामुळे एका चांगल्या, कर्तव्यनिष्ठ कर्मचाºयाला मुकल्याची भावना वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके आणि सहायक पोलिस निरीक्षक अविनाश महाजन यांनी व्यक्त केली. या तील डंपर चालकाचा शाेध घेण्यात येत असल्याचे वर्तकनगर पाेलिसांनी सांगितले.