जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: सलूनच्या नावाखाली घोडबंदर रोडवरील एका फॅमिली सलूनमध्ये शरीर विक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी मंगळवारी दिली. तिच्या तावडीतून दोन पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे.
घोडबंदर रोडवरील एका फॅमिली सलूनमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी यांच्या पथकाने कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विहंग हॉटेलजवळील या फॅमिली सलूनमध्ये बनावट गिऱ्हाइक पाठवून छापा टाकला.
या कारवाईदरम्यान दोन तरुणींना शरीर विक्रयासाठी पाठविण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर या पथकाने मंगळवारी दुपारी ३ वाजता यातील दोन पीडित तरुणींची सुटका केली. या मुलींना सेक्स रॅकेटमध्ये अडकविणाऱ्या दलाल महिलेला ताब्यात घेण्यात आले असून तिच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक व्यवसाय (पिटा) कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. चार दिवसांपूर्वीही ठाण्यातील नौपाडा भागात भरवस्तीत तीन पेट्रोल पंपाजवळ एका फॅमिली सलूनमध्ये नौपाडा पोलिसांनी अशाच प्रकारे कारवाई करीत दोन पीडितांची सुटका केली होती.