ठाणे : पती आणि मुलाचे आजारपण, घरची बेताची परिस्थिती यातून वैफल्यग्रस्त झालेल्या एका ४५ वर्षीय महिलेने इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी कासारवडवली पाेलिसांत आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
वाघबीळ गावात राहणारी ही महिला हिरानंदानी इस्टेट येथील पेनिकल इमारतीमध्ये रुग्णाला तेल मालिश करण्यासाठी ३१ ऑक्टाेबर २०२४ राेजी सकाळी ९:२५ वाजण्याच्या सुमारास गेली हाेती.
तिने इमारतीच्या २२ व्या मजल्यावर जाऊन त्याठिकाणी असलेल्या रेफ्यूज फ्लॅटमध्ये प्रवेश करून इमारतीवरून उडी मारली. तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या मृतदेहाची जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजवरून प्रकार उघडकीसया महिलेकडे पेनिकल इमारतीमध्ये प्रवेशाचे ॲक्सेस कार्ड हाेते. त्या कार्डच्या आधारे तिने या इमारतीमध्ये प्रवेश करून ती इमारतीच्या २२ व्या मजल्यावर गेली. या मजल्यावरील पायऱ्यांवर बसून तिने गुटख्याचे सेवन केले. रेफ्यूज फ्लॅटमध्ये प्रवेश करून उडी मारून आत्महत्या केली. प्रकार इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजवरून उघड झाला. तिचा पती किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. मुलगा डोळ्यांच्या विकाराने ग्रस्त आहे. आत्महत्येच्या कारणाचा शाेध घेण्यासाठी तपास सुरु आहे.