उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रांगणात रिक्षात महिलेने गुरवारी पहाटे साडे तीन वाजता रिक्षात गोंडस बाळाला जन्म दिला. नर्स व डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे महिला व बाळाची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात रिक्षाने प्रसुतीसाठी आलेल्या शोबाना नावाच्या महिलेला रिक्षातच प्रसूतीकळा सुरू झाल्या. मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रांगणात रिक्षा आल्यावर रिक्षाचालक व एका रुग्णवाहिकेच्या चालकांनी रुग्णालयात धाव घेत, डॉक्टर व नर्स यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांनी गरोदर महिलेची परिस्थिती बघून रिक्षातच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. ही घटना गुरवारी पहाटे साडे तीन वाजताची आहे. रुग्णालयातील महिला इंटन डॉक्टर, परिचारिका लागलीच तत्परता दाखवून सदर महिलेची प्रसुती रिक्षात यशस्वी केली. रिक्षातील त्या महिलेने एका बाळास जन्म दिला. यावेळी रुग्णालयाचे वार्डबॉय धीरज सितापारा आणि खाजगी ॲम्बुलन्स चालक विशाल शेलार यांनी त्या महिलेस प्रसूती वॉर्ड पर्यंत स्ट्रेचरवरून घेऊन गेले. महिला व बाळाची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.
मध्यवर्ती रुग्णालयात ५ महिन्यांपूर्वी एका महिलेची सहाव्या महिन्यात प्रसूती होऊन अवघ्या अर्धा किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. त्या बाळावर ३ महिने रुग्णालयातउपचार करून बाळ ठणठणीत होऊन घरी पाठविले. त्याच घटनेचा प्रत्येय गुरवारी रुग्णालयात आला. सरकारी रुग्णालयांबद्दल अनेक गैरसमज असतात. मात्र त्या गैरसमजाला मध्यवर्ती रुग्णालयाने छेद दिला आहे. मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे महिलेची रिक्षातच यशस्वी प्रसूती करण्यात आली असून सरकारी रुग्णालयात अद्याप माणुसकी असल्याचे दिसून आले. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी रुग्णालयाच्या नर्स, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत कौतुक केले असून रुग्णालयात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती यावेळी दिली. प्रसूती झालेली महिला व बाळावर रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची तब्येत ठणठणीत आहे.