मुंबई:
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मोठी रक्कम पाठवत असाल आणि ती चुकून अनोळखी व्यक्तीच्या खात्यात गेली तर काय होईल? याची केवळ कल्पना केली तरी मोठा धक्का बसतो. मात्र, चुकून असे घडलेच तर आपण बँकेशी वा संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो अथवा पोलिसांना माहिती देतो. सध्या सर्वत्र ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. ऑनलाइन व्यवहाराचे फायदे खूप आहेत. मात्र, ते करताना काळजी नाही घेतली तर नुकसानही होऊ शकते. एक चुकीचा आकडा जरी पडला तरी मोठी गडबड होते, असेच काहीसे मुंबईतील एका महिलेच्या बाबतीत घडले आहे. मीरा रोडमधील ३८ वर्षीय महिलेने चुकून तब्बल ७ लाख रूपये एका अनोळखी व्यक्तीला पाठवले.
विशेष म्हणजे पैसे पाठवताना झालेल्या चुकीमुळे ज्या व्यक्तीला पैसे मिळाले आहेत, त्याने आपल्याला लॉटरी लागल्याचा दावा करत पैसे परत करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ रोजी मीरा रोडमधील महिला आपल्या नातेवाईकांना पैसे पाठवत असताना घडली. महिलेने चुकीचा आकडा टाकल्याने हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. महिलेला आपली चूक लक्षात येताच तत्काळ तिने बॅंकेत धाव घेतली, मात्र ही चूक महिलेची असल्याची सांगत बॅंक कर्मचाऱ्यांनी मदत करण्यास नकार दिला.
व्यक्तीने पैसे परत करण्यास दिला नकार
३० जून रोजी महिलेने वसई विरार पोलिसांच्या सायबर विभागाकडून यासंदर्भात मदत मागितली. यानंतर पोलिसांनी पैसे मिळालेल्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि रक्कम परत करण्यास सांगितले. सर्वप्रथम त्या संबंधित व्यक्तीने आपल्याला लॉटरी लागली असल्याचे सांगत पैसे परत करण्यास नकार दिला. पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवत, कारवाई करण्याचा इशारा देताच सदर व्यक्ती पैसे परत करण्यास तयार झाली. या नाट्यमय घडामोडींनंतर २ दिवसांनी महिलेच्या खात्यात ७ लाख रूपये जमा झाले.