- जितेंद्र कालेकर ठाणे - मोटारसायकलवरून घोडबंदर रोडने ठाण्याकडे जाणाऱ्या राजीव (३७) आणि अक्षता धानवी (३६) या दाम्पत्याला पाठीमागून आलेल्या एका अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेल्या अक्षता यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी दिली.
धानवी दाम्पत्य हे २० मार्च रोजी आनंदनगर येथे कॉन्सनट्रिक्स या कंपनीत नोकरी करत असल्याने कामासाठी घोडबंदर रोडने पहाटे पावणे चारच्या सुमारास जात होते. त्याच दरम्यान आशा वाईन शॉप समोरील सेवा रस्त्यावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर भाईंदरपाडा येथे त्यांच्या पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत अक्षता यांच्या डोक्याला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तर राजीव यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला तसेच हाताला मार लागला. दरम्यान, घटनास्थळी बेशुद्ध झालेल्या अक्षता हिला तातडीने कासारवडवली पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. अपघातानंतर कोणतीही मदत न करता पसार झालेल्या वाहन चालकांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.