ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका २८ वर्षीय महिलेच्या घरात दोन तरुणांनी शिरकाव करीत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील सतोष चव्हाण (३१, रा. मुलूंड, मुंबई) या आरोपीला अटक केली असून दूसरा पसार झाला आहे. दरम्यान, या महिलेच्या नातेवाईकांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार आरोपीने केली आहे. वागळे इस्टेट, रोड क्रमांक ३३, इंदिरानगर भागात राहणाऱ्या पिडित महिलेच्या घरात ३१ मार्च २०२४ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास संतोष चव्हाण आणि त्याचा मित्र सर्वेश यादव (३४, रा. कोपरी, ठाणे) हे दोघे शिरले. या दोघांनीही तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला शिवीगाळ करुन लोखंडी कडयाने मारहाण केली. शिवाय, तिचे घर जाळून टाकण्याचीही धमकी दिली.
या प्रकाराला पिडित महिलेने प्रतिकार केल्यानंतर त्याच भागातील काही मुलांनी दोन्ही आरोपींना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद सुरु असतांनाच या महिलेच्या भावाने ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. ही माहिती मिळताच श्रीनगर पोलिस ठाण्याचे दोन बीट मार्शल त्याठिकाणी पोहचले. पाेलिसांनी यात मध्यस्थी करुन वाद साेडविला. त्या दरम्यान, हाणामारी करणाऱ्यांनी आणि विनयभंगातील दोन पैकी एका आरोपीने पळ काढला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर विनयभंगासह मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल केला असून संतोष याला पोलिसांनी १ एप्रिल २०२४ रोजी सकाळी अटक केली. तर संतोष याच्या तक्रारीनुसार तो यातील महिलेसोबत बोलत असतांना तिच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच अन्य पाच ते दहा जणांनी संतोष आणि त्याचा मित्र सर्वेश यादव याला मारहाण केली. चव्हाण याच्या तक्रारीवरुनही दुसऱ्या गटातील दहा जणांविरुद्ध हाणामारीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक किशोर बोडके हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.