ठाणे: ठाण्यातील कोपरी भागात गरिब मुलींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी मंगळवारी दिली. या महिलेच्या तावडीतून पाच पिडित तरुणींची सुटकाही करण्यात आली आहे.
कोपरीतील रेल्वे स्थानक परिसरातील शिवम हॉटेल भागात एक दलाल महिला काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शिवम हॉटेल परिसरात या पथकाने सापळा रचून एका बनावट गिºहाईकाला त्याठिकाणी पाठविले. त्याने या महिलेकडे मागणी केल्यानंतर त्याठिकाणी पाच तरुणी पाठविण्यात आल्या होत्या. या प्रकाराची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने यातील दलाल महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्या तावडीतून २० ते २५ वयोगटातील पाच पीडित तरुणींची सुटका केली. याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. यातील पिडित तरुणींना सुरक्षेच्या कारणास्तव ठाण्यातील मानपाडा येथील लिविंग वॉटर मिशन या संस्थेच्या सुरक्षा गृहात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे, गोवा आणि लोणावळ्यात रॅकेट ठाण्यातून एखाद्या डान्स शो इव्हेंट शो मध्ये काम करणाºया महिला किंवा तरुणींना पैशांचे अमिष दाखवून त्यांना शरीरविक्रयासाठी ही महिला भाग पाडत होती. त्यानंतर गोवा, महाबळेश्वर, पुणे, लोणावळा, इगतपुरी, मुंबई आणि ठाणे परिसरातील फार्म हाऊस किंवा फ्लॅटवर त्यांना पाठविले जात होते, अशी माहितीही तपासात पुढे आली आहे. व्हॉटसअॅपवरुन फोटो पाठविले जायचे शरीरविक्रयासाठी तयार झालेल्या मुली किंवा महिलांचे फोटो व्हॉटसअॅपवरुन ग्राहकांना पाठविले जायचे. मग पसंतीनुसार दर ठरविल्यानंतर एका तरुणीसाठी दोन ते पाच हजारांची रक्कम ग्राहकांकडून घेतली जात होती, अशीही बाब समोर आली.