अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये तिकीट तपासनीसने दाखविलेल्या सतर्कतेने धावत्या लोकलला ओढल्या जाणाऱ्या महिला प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
आज, शुक्रवार 14 जुलै रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कर्जतकडे जाणाऱ्या लोकल पकडताना हा प्रकार घडला. प्लॅटफॉर्मवर असलेल्या तपासनीसाने सतर्कता दाखवत लोकल आणि फलाटाच्या मध्ये अडकलेल्या महिला प्रवाशाला ओढून त्यांचे प्राण वाचवले.
अंबरनाथ रेल्वे स्थानकात सकाळी सात वाजून तीन मिनिटांनी कर्जतला जाणारी लोकल आली होती. या लोकलमध्ये चढताना एका वयोवृद्ध महिला प्रवाश्याचा तोल गेला. त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवर पडल्या आणि फलाट आणि लोकलमध्ये अडकून जात होत्या. त्याचवेळी स्थानकात उपस्थित असलेल्या तिकीट तपासनीस अबिनाश कुमार आणि नागरिक शामु यांनी तातडीने धाव घेत संबंधित महिलेला लोकलपासून मागे खेचत त्यांचे प्राण वाचवले.
मध्य रेल्वे प्रशासनाने ट्विटद्वारे या घटनेची चित्रफीत प्रसारीत करत माहिती दिली. कर्तव्यावर असलेल्या तिकीट तपासनीस आणि सहप्रवाशाचे या कृतीमुळे कौतुक होते आहे.