ठाणे : मुंबई नाशिक पूर्व द्रूतगती महामार्गावरील उड्डाण पूलाच्या कामासाठी उभारण्यात येणाऱ्या लोखंडी रेलिंगचा साचा दीपक ब्रिजीया (१८, त्रिशदा कन्स्ट्रक्शन, ठाणे) या कामगाराच्या अंगावर पडून तो या रेलिंगमध्ये अडकल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खारेगाव टोलनाका येथे घडली. स्थानिक कर्मचाऱ्यांनी खासगी हायड्राच्या मदतीने त्याला या रेलिंगमधून बाहेर काढले. त्याच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मुंबई नाशिक हायवे मार्गावरील खारेगाव टोल नाका येथे पूलाचे काम सुरू आहे. या कामासाठी उभारण्यात येणाऱ्या लोखंडी रेलिंगचा साचा अचानक दीपक या कामागाराच्या अंगावर पडला. सुदैवाने, त्यावेळी त्याच्यासोबत काम करणाऱ्या कामगारांनी मोठया कौशल्याने खासगी हायड्राच्या मदतीने त्याच्या अंगावर पडलेला साचा बाजूला केला.
या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पण ते पोहचण्यापूर्वीच दीपकला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला मोठी दुखापत झाली नसून त्याच्या डाव्या पायाला आणि कमरेला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दीपक हा मूळचा छत्तीसगडच्या उमरकुली गावचा रहिवासी असून सध्या तो ठाण्यातील रेतीबंदर येथे वास्तव्याला आहे. तो त्रिशदा कन्स्ट्रक्शन या कंपनीचा कामगार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.