ठाणे: ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल झाला, तसेच पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केल्याच्या वैफल्यातून मनीष उतेकर (२४, रा. हनुमाननगर, वागळे इस्टेट, ठाणे) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. वाहतूक पोलिसांनी केलेल्या छळामुळे त्याने आत्महत्या केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच न्याय द्यावा, अशी मागणी उतेकर कुटुंबीयांनी केली आहे, तर वाहतूक पोलिसांनी या आरोपाचा इन्कार केला.
ठाणे शहर वाहतूक शाखेच्या कोपरी युनिटच्या कर्मचाऱ्यांनी गटारी अमावास्येच्या दिवशी ड्रंक ॲण्ड ड्राइव्हची कारवाई वाहन चालकांवर केली होती. याच कारवाईमध्ये मनीष आणि त्याचे इतर दोन मित्र सापडले. चालक मनीषवर मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचा कलम १८५ नुसार गुन्हा तर त्याच्या अन्य दोन साथीदारांवर कलम १८८ नुसार कारवाई झाली. या कारवाईनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात जावे लागेल, असे सांगितले. त्याने न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारावा, अशी मागणी केली. प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसही आपले ऐकत नसल्याच्या भावनेतून मानसिक दडपणामुळे मनीषने शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातच गळफास घेत आत्महत्या केली.
‘ती’ कारवाई कायदेशीर
वाहतूक पोलिसांच्या तपासणीमध्ये मनीषच्या शरीरात अल्कोहोल मिळाले होते, तसा गुन्हाही दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारून मिटविण्यात यावे, अशी मनीष आणि त्याच्या मित्रांची अपेक्षा होती, असे श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांनी सांगितले. मेसेजमध्ये उल्लेख केलेल्या नावाचे कोणीही पोलिस वाहतूक शाखेत काम करीत नाहीत. तरीही कुटुंबीयांच्या आरोपांचीही तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले.
पोलिस म्हणतात...
या प्रकरणात त्यांनी न्यायालयात जाणे नियमानुसार अपरिहार्य होते. न्यायालयात त्यांना दंड झाला असता. त्यांचा कोणीही मानसिक छळ केलेला नाही. ते दुसऱ्या दिवशी येताे, म्हणाले; पण आलेच नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती, असे कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांनी सांगितले.
मृत्यूपूर्वी आईला केला मेसेज
मृत्यूपूर्वी मनीष याने आईला मोबाइलवरून केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, मला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले होते. त्यांनी न्यायालयात जाण्याची धमकी दिली होती. पुष्पक आणि सुधाकर या पोलिसांनी करिअर बर्बाद करायचे असल्याचे सांगितले. ट्रॅफिक पोलिसांचा मान राखतो; पण कोणासोबत असे वागू नका.