मीरा रोड : मीरा रोडच्या जांगिड सर्कल भागात वर्दळीच्या भररस्त्यावर अंकुश राजेश राज (२०, रा. क्वीन्स स्टार, मीरा राेड) या तरुणाची ११ जणांच्या टोळक्याने चाकू, तलवारीने हल्ला करून हत्या केली. याप्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य दाेन जणांचा शोध पोलिस घेत आहेत.
मीरागाव महामार्गावरील पेट्रोलपंपावर सोमवारी गाडी पुढे नेल्याच्या कारणावरून मृत अंकुशचे मामा हर्ष राज व आयुष सिंग (२०, रा. काशिगाव) यांच्यात भांडण झाले. तेथे हर्ष राजने आयुषला कड्याने मारले. त्यावेळी अंकुशने दाेघांचे भांडण सोडवले. त्याचा राग आयुषच्या मनात हाेता. त्यानंतर एमटीएनल मार्ग व जांगिड सर्कलदरम्यान असलेल्या एका गॅरेजवर अंकुश हा सायंकाळी दुचाकीचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी आला हाेता. त्यावेळी आयुष्य हा त्याच्या अन्य १० साथीदारांसह चाकू, तलवार घेऊन तेथे आला. भररस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी आयुष्य व त्याच्या साथीदारांनी अंकुशवर हल्ला चढवला. त्याच्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंकुशला नजीकच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंकुश हा एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. हत्येची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त जयंत बजबळे व अविनाश अंबुरे, सहायक आयुक्त विलास सानप हे मीरा रोड, काशिमीरा, नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखेचे निरीक्षक आदी घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्हीच्या आधारे आराेपींची धरपकडहल्ल्याची संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. त्याआधारे गुन्हे शाखा कक्ष १ चे निरीक्षक अविराज कुराडे व पथकाने वेगाने तपास करून आयुष याच्यासह आकीब अन्सारी (२०), फरहान शेख (१९), अरमान लदाफ (१९, सर्व रा. काशिगाव), हैदर पठाण (१९, रा. डाचकूलपाडा) यांना पकडले. तर अशपाक मन्सुरी (२५, रा. स्नेहल नगरी) याला काशिमीरा पोलिसांनी पकडले. मेहताब खान (२२, रा. नयानगर), अमित सिंग (३०) व सरवर हुसेन खान (२३, दाेघेही शांतीनगर) यांना मीरा रोड पोलिसांनी अटक केली. आणखी दाेघांचा शाेध सुरू आहे.