उल्हासनगर: शहरातील नो पार्किंग ठिकाणी उभी केलेली मोटरसायकल टोईंगवाले नेताना तरुणाने तिकडे धाव घेतली. मात्र दुकाना समोरील लोखंडी जाळीत पाय अडकून तरुण जाणाऱ्या रिक्षावर पडल्याने, गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून टोईंगवाल्यासह दुकांदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगरात रस्स्त्याच्या नो पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या गाड्या कोणत्याही पूर्वसूचना विना व मार्किंग विना उचलल्या जात असल्याने, टोईंगवाल्या विरोधात नागरिकांत रोष निर्माण झाला. या दरम्यान शहर पश्चिम मध्ये शनिवारी दुपारी टोईंग गाडीवाल्यानी विनय भोईर यांनी रस्त्याच्या कडेला लावलेली मोटरसायकल उचलली. उचललेली गाडी घेण्यासाठी विनय धावत गेला असता, दुकाना समोर ठेवलेल्या लोखंडी जाळीत पायात अडकून रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर जाऊन पडला. यामध्ये त्याचे डोके फुटन रक्ताने माखला. टोईंग गाडीवरील वाहतुक पोलिस व स्थानिक व्यापाऱ्यांनी विनयला क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्याच्यां डोक्याला तब्बल १७ टाके लागले असून आमदार कुमार आयलानी यांच्यासह व्यापाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
वाहतूक विभागाच्या टोईंगवाल्यांमुळे विनय भोईर जखमी झाला असल्याचा आरोप एकीकडे होत आहे. तर दुसरीकडे व्यापारी दुकाना समोरील फुटपाथच्या बाहेर रस्त्यावर लोखंडी जाळी टाकत असल्याने, असे अपघात होत असल्याचे बोलले जाते. दुकानासमोर लोखंडी जाळ्या ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून या जाळ्या महापालिका जप्त का करीत नाही? असा प्रश्न निर्माण झाला. या अपघात प्रकरणी दादागिरी करणारे टोईंगवाले व संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अपघातानंतर व्यापारी व स्थानिक नागरिकांनी वाहतूक विभागा कार्यालयात धाव घेऊन टोईंगवाल्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तर नागरिकांनी दुकाना समोर थेट फुटपाथच्या पुढील रस्त्यावर लोखंडी जाळी ठेवणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दुकाना समोर अवैधपणे जाळी ठेवूनही महापालिका प्रभाग अधिकारी कारवाई करीत नसल्याने, अश्या अधिकाऱ्यावरही यानिमित्ताने कारवाईच्या मागणीने जोर धरला आहे.