ठाणे : महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांत सध्या ‘ए... लाव रे तो व्हिडीओ’, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश घुमत असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्याचे व सरकारमधील उणिवांचे व्हिडीओ प्रदर्शित केले जात आहेत. मात्र, ठाणे लोकसभा मतदारसंघात राज यांचा तोच आदेश घुमण्याची शक्यता कमी असल्याचे मनसेच्या उच्चपदस्थ नेत्यांनी सांगितले. अर्थात, मनसेचे स्थानिक नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते राज यांनी ठाण्यात सभा घ्यावी, याकरिता प्रयत्नशील आहेत. परंतु, ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादीचे उमेदवार तुलनेने कमकुवत वाटत असल्याने राज उत्सुक नसल्याची चर्चा आहे. कारण, निवडणूक निकालानंतर राज यांनी जेथेजेथे सभा घेतल्या, तेथेतेथे निकाल कुणाच्या बाजूने लागले, याची चर्चा होणे स्वाभाविक असल्याने जेथे हमखास विरोधी उमेदवारांची विजयाची शक्यता आहे, तेथे पायधूळ झाडण्याचा चाणाक्षपणा राज यांनी दाखवल्याचे बोलले जाते.लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नाही. मात्र, केवळ नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीला राजकीय क्षितिजावरून दूर करा, हा संदेश देण्याकरिता राज यांच्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा झाल्या. पार्थ पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, अशा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर व पुन्हा विजयी होण्याची दाट शक्यता असलेल्या उमेदवारांकरिता राज यांनी सभा घेतल्या आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे संघटन मजबूत आहे. तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना ऐनवेळी गणेश नाईक यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यावर रिंगणात उतरवले आहे.
‘ए... लाव रे तो व्हिडीओ’ ठाण्यात नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:14 IST