आमोद काटदरे
ठाणे : आजी आणि नातू-नात यांच्या नात्यातील वीण अधिक घट्ट व्हावी, तसेच या दोन्ही पिढ्यांनी आपल्यातील ज्ञानाचे अदान-प्रदान करावे, या उद्देशाने मुरबाड तालुक्यातील धसईपासून तीन किलोमीटरवर असलेल्या वडाचीवाडी येथे आता दर शनिवारी दुपारी दोन तास आजी-नातू अथवा नात अर्थात ‘आना’ शाळा भरणार आहे. लवकर या शाळेचा वर्ग भरेल, अशी माहिती फांगणे येथील आजीबार्इंच्या शाळेचे प्रणेते योगेंद्र बांगर यांनी दिली.
जग एकीकडे तंत्रज्ञान, डिजीटल युगाकडे वाटचाल करत असताना बांगर यांनी विविध कारणांनी शिक्षण अर्धवट राहिलेल्या, तसेच शिक्षण घेता न आलेल्या आजीबार्इंना साक्षर करण्याचा विडा उचलला. मोतीराम गणपत दलाल ट्रस्टचे दिलीप दलाल यांच्या सहकार्याने त्यांनी जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर ८ मार्च २०१६ ला फांगणे येथे आजीबार्इंच्या शाळेचे बीज रोवले. आजही या शाळेत ३० आजी मोठ्या आनंदाने शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ने या शाळेची दखल घेत विक्रमांमध्ये नोंद केली आहे. त्याचबरोबर १५ देशांतील प्रतिनिधींनी या शाळेला भेट त्यांच्या कार्याचे कौतुक केले.या शाळेमुळे बांगर यांचा उत्साह आणखी वाढला आहे. आता ते वडाची वाडी येथे ‘आना’ शाळा सुरू करत आहेत. या शाळेसाठी त्यांना पुण्यातील मुकूल माधव फाउंडेशनचे सहकार्य लाभले असून, हीच संस्था या शाळेचे व्यवस्थापन सांभाळणार आहे.विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आई-वडील आणि त्यांच्या मुलांपुरतीच कुटुंबे मर्यादित राहिली आहेत. त्यामुळे आजी-नातू-नात यांच्यातील संवाद हरवला आहे. ग्रामीण भागात आजही एकत्रित कुटुंबे नांदत असली तरी तेथील जुन्या पिढीतील साक्षरतेचे प्रमाण तुलनेत कमी आहे. ‘आना’ शाळेच्या संकल्पनेमुळे या दोन पिढ्यांमधील ही दरी आता संपुष्टात येईल. या शाळेत वडाची वाडी येथील ७० आजी आणि त्यांची इयत्ता पहिली ते पाचवीतील नातवंडे एकत्र शिक्षण घेणार आहेत. मनोरंजन केंद्राप्रमाणे या शाळेचे स्वरूप असणार आहे. आजी जुन्या गोष्टी, संस्कृती, परंपरा तसेच त्यांचे अनुभव आपल्या नातवंडांना सांगतील. तर, नातू-नात आपल्या आजींना लिहायला, वाचायला शिकवतील, अशी त्या शाळेमागील एक कल्पना आहे.शिक्षणाला वयाचे बंधन नाही. लहान मुलांना अभ्यासाची गोडी लागावी, तसेच आजींकडील मौैखिक ज्ञानाचे भांडार जतन व्हावे, या उद्देशाने वडाची वाडी येथील एका जागेत ‘आना’ शाळा सुरू करत आहोत. त्यात काही पुस्तके, खेळणी, एक लॅपटॉप, जुना टेपरेकॉर्डर आणि दोन हजार कॅसेट आदी साहित्य असेल. आंघोळीची गोळी संस्थेचे अविनाश पाटील यांचे त्याकरिता सहकार्य मिळाले आहे. या शाळेत एक शिक्षिकाही कार्यरत असेल, अशी माहिती योगेंद्र बांगर यांनी ‘लोकमत’ला दिली.