टिटवाळा: कल्याण डोंबिवली महानगर पालिका उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या प्रयत्नांतून नागरी सुविधा केंद्र मधूबन येथे कायमस्वरूपी मोफत आधार कार्ड केंद्राचे उदघाटन नुकतेच करण्यात आले. या आधी कल्याण तहसील येथे आधार कार्ड केंद्र असल्यामुळे मांडा-टिटवाळा व परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण होत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी व पालकांनी टिटवाळा परिसरात आधार केंद्र सुरू करावे यासाठी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्याकडे मागणी केली होती.
नागरिकांच्या मागणीनुसार यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडे सतत मागणी करून मोफत आधार केंद्र सुरू केले आहे. या उदघाटन प्रसंगी उपमहापौर यांनी आधारचे महत्त्व पटवून दिले "जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ घ्यावा. 1 दिवसाच्या मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत या सेवेचा लाभ घेऊ शकतात. तसेच समाजातील सर्व घटकांतील लोकांसाठी आधार कार्ड अत्यावश्यक आहे" असे त्यांनी सांगितले. या वेळी शेकडो नागरिक व कार्यकर्त्यांनी उपस्तिथी दर्शवली. तसेच काही नागरिकांनी त्वरित या सेवेचा लाभ घेतला.