ठाणे - प्रधानमंत्री आवास योजने तील घरकूल लाभाच्या दृष्टीने जिल्ह्यातील ५७ हजार ३२९ कुटुंबांपैकी ५० हजार ८५७ कुटुंबाचे आधार लिंक (सिडिंग) करण्यात आलेले आहे. आधार लिंक केलेल्या या ग्रामीण भागातील कुटुंबियांचा जिल्ह्याच्या सन २०१८-१९ या कालावधीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या 'प्रपत्र ड' यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीस अनुुुुसरुन केंद्र शासनाकडून एका घरकुलासाठी एक लाख 20 हजार रुपये प्रमाणे या यादीतील सर्वंच परिवारासाठी हे अनुदान मंजूर करण्याची अपेक्षा ठाणे जिल्हा परिषदे कढून व्यक्त होत आहे.
सर्वेक्षणातील या कुटुंबातील सदस्यांचे आधारलिंक ( सीडिंग) करण्याचे काम कोरोनाच्या महामारीतही ठाणे जिल्हा परिषदेकडून युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आलेले आहे. सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार संथगतीने सुरू असले तरी ग्रामीण भागात आवास योजनेची विविध कामे नियमित सुरू आहेत. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली 'जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा' या विभागाने प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ग्रामीण भागात घरकुल बांधणीत अव्वल काम केले आहे. यास अनुसरुन या प्रधानमंत्री आवास योजनेत ज्या कुटुंबाचे नावे नाहीत मात्र योजनेच्या निकषामध्ये ते कुटूंब बसू शकतात, अशा कुटुंबांची नावे ग्रामसभेच्या अनुमतीने सुचवण्यात आली आहेत. त्यांचा समावेश या प्रपत्र ड या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. ते कुटुंबीय २०१८-१९ या कालावधीतील आहेत. त्यांचे सर्वेक्षण 'आवास प्लस' या संकेतस्थळावर करण्यात आलेले आहे. प्रपत्र ड यादीतील कुटुंबाचे सर्वेक्षण झाल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरून तालुकास्तरावर असणाऱ्या घरकूल कक्षाकडे या कुटुंबांची यादी पाठवून त्यांचे डाटा इन्ट्री ऑपरेटरद्वारे आधारलिंक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील या ५७ हजार ३२९ कुटुंबांपैकी ५० हजार ८५७ कुटुंबाचे आधार लिंक( सिडिंग) करण्यात आलेले आहे. यामुळे ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम येत्या दोन दिवसात १५ जुलैपर्यन्त पूर्ण करण्याचें उद्दिष्ट असल्याचे प्रकल्प संचालक डॉ.रुपाली सातपुते यांनी सांगितले. या उर्वरित उद्दिष्टे देखील वेळेत पूर्ण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिले आहे. सध्या तरी आधार लिंक करण्याचे उद्दिष्ट ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित १० टक्के काम बाकी आहे. या 100 टक्के उद्दिष्ट साध्य झाल्या नंतर शासन 2020- 21 वर्षा साठी लक्षाक निश्चित करुन देणार आहे.