कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला बुधवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्यासाठी महापालिकेने तीन अग्निशमनचे तीन बंब पाठवले होते; मात्र तीन तास प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नव्हती. ही आग धुमसत असल्याने परिसरात सर्वत्र धुराचे लोट उसळून नागरिकांची घुसमट झाली. स्थायी समितीच्या बैठकीतही या आगीचे पडसाद उमटले.आधारवाडी डम्पिंगच्या कचऱ्याला बुधवारी पुन्हा आग लागली, तेव्हा महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती दालनात बैठक सुरू होती. यावेळी डम्पिंगच्या आगीबाबत सदस्य विचारणा करत असून प्रशासनाने त्याची माहिती द्यावी, अशी सभापती विकास म्हात्रे यांनी प्रशासनाला सूचना केली. भाजप सदस्य वरुण पाटील यांनी आग कशी लागली, असा सवाल केला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आॅगस्टीन घुटे यांनी कचºयाला दरवर्षी आग लागते. मिथेन वायू तयार झाल्याने कचºयाला आग लागते, तर काही वेळेस अनोळखी व्यक्ती आग लावतात. तसेच तेथे सुरक्षारक्षक नेमलेले असल्याची माहिती दिली. त्यावर सदस्यांनी उपाययोजना करूनही आग का लागते, याचाच अर्थ डम्पिंगला आग लागू नये, यासाठी ठोस उपाययोजना केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश सभापती म्हात्रे यांनी प्रशासनास दिले. उपायुक्त मारुती खोडके म्हणाले की, डम्पिंगचा कचरा पांगवला जातो. तेथे सुरक्षारक्षकही आहे; मात्र हा कचरा उघडाच आहे. एखादी रिक्त असलेली दगडखाण पाहून तेथे हा कचरा हलवण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.आधारवाडी डम्पिंगवर महापालिका हद्दीतून गोळा होणारा ६४० टन कचरा टाकला जातो. तेथे कचºयाचा २५ मीटर उंचीचा कचºयाचा ढीग लागला आहे. जेसीबीच्या साहाय्याने हा कचरा रोज पसरवला जातो. कचºयामध्ये मिथेन गॅस तयार होऊन तो सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आला तर आग लागत असल्याचा अंदाज महापालिका प्रशासन व्यक्त करते. मात्र, या कचºयाला कोणी आग लावत आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न महापालिकेने कधीच केला नाही. तीन सुरक्षारक्षकही असूनही आगीचे प्रकार घडत आहेत.उंबर्डे, बारावे प्रकल्पांना विरोधआधारवाडी डम्पिंग बंद करण्यासाठी महापालिकेकडून उंबर्डे व बारावे येथे प्रकल्प राबवले जात आहेत. उंबर्डे प्रकल्प बांधून तयार असून तेथे प्रक्रिया करण्यास स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर यांचा विरोध आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील अन्य सदस्यांचाही कल्याण पश्चिमेत कचराप्रक्रिया करण्यास विरोध आहे. शहरातील अन्य ठिकाणीही कचरा प्रकल्प राबवण्याची मागणी नुकत्याच झालेल्या महासभेत केली होती.
आधारवाडी डम्पिंगला लागली आग, धुरामुळे कल्याणमधील नागरिकांची घुसमट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 5:14 AM