कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करून तेथील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याकरिता प्रकल्प राबविण्याची मागणी करणारी सात वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने राष्ट्रीय हरीत लवादाकडे वर्ग केली आहे. डंपिंग ग्राऊंड व घनकचरा व्यवस्थापनाचा विषय हा पर्यावरणाशी संबंधित असल्याने ही याचिका लवादाकडे पाठवत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.आता या याचिकेची सुनावणी लवादाकडे केली जाणार असलीतरी त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. २००० साली घनकचरा व्यवस्थापनाबाबतची नियमावली न्यायालयाने आखून दिलेली असतानाही महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. आधारवाडी डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने ते बंद करण्याची नोटीस महापालिकेस बजावली होती. मात्र महापालिकेने हालचाल न केल्याने आजूबाजूच्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. परिणामी हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी २००९ मध्ये केली होती. उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये शहरातील नव्या इमारतींच्या बांधकामास स्थगिती दिली होती. तब्बल ९ महिन्यांनंतर स्थगिती उठवली. आता डंपिंग ग्राऊंडचा विषय हा पर्यावरणाशी निगडीत असल्याने याचिका राष्ट्रीय हरीत लवादाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
आधारवाडीची याचिकाही राष्ट्रीय हरीत लवादाकडे
By admin | Published: October 11, 2016 2:57 AM