लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राज्याचा विकास गतीमान पध्दतीने सुरु आहे, विकासाची कामे वेगाने होत आहेत. परंतु काही लोकांना यामुळे पोटात दुखत आहे. त्यांनी मुंबईत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात उपचार करुन घ्यावेत ते उपचार देखील मोफत असल्याची टिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.
ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुपर स्पेशालीटी रुग्णालयात रुपांतर केले जाणार आहे. त्याचा भुमीपुजन सोहळा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या समेवत केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आरोग्य मंत्री तानाजी सावंत आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही टिका केली. राज्याचा नुकताच अर्थसंकल्प सादर झाला तो पचांमृत अर्थसंकल्प म्हणून ठरला आहे. ज्यात आरोग्य आणि शिक्षणाला अधिक महत्व देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुल जनआरोग्य योजना दिड लाखावरुन पाच लाखांची केली. किडनी ट्रान्सर्पंन्टची योजना अडीच लाखापर्यंत वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्याच्या नवनवीन योजना आखल्या जात आहेत, ज्याच्या सुविधा अगदी कनार्टकच्या टोकापर्यंत पोहचविल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून अनेकांना उपचार मिळाले आहेत. हिरकणी कक्षाच्या निर्मिती करण्यात आली असून जिल्हा पातळीवर प्रत्येक ठिकाणी अत्याधुनिक हिरकणी कक्ष निर्माण केले जाणार आहेत. प्रत्येकाला मदत मिळेल यासाठी तत्काळ निर्णय घेतले जात आहेत.
टेंभी नाका जिल्हा रुग्णालयाचे एक वेगळे नाते असून जिल्ह्यात संघटना वाढविण्यात जिल्हा रुग्णालयाचे योगदानही मोठे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना काळात देखील जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून अनेकांना जीवदान मिळाले आहे. आता ठाण्यात कॅन्सर हॉस्पीटलची निर्मिती केली जाणार आहे. तर यापुढे जिल्ह्यातील एकाही रुग्णाला मुंबईत जाण्याची गरज पडणार नसून सुपरस्पेशीलीटीच्या माध्यमातून सर्व उपचार एकाच छताखाली होणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या रुग्णालयाचे काम १५ महिन्यात पूर्ण केल्यास बोनस दिला जाईल असे जाहीर करतांना कोणत्याही विभागाने या हॉस्पीटलच्या निर्मितीत वेळकाढू पणा करु नये अशी तंबी देखील त्यांनी दिली. तर मागील अडीच वर्षात जे काही बंद पडले होते. ते आम्ही पुन्हा सुरु केले असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"