कल्याण : कल्याण-डोंबिवली पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पक्षाने शुक्रवारी महापालिका मुख्यालयाशेजारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
‘आप’चे पदाधिकारी धनंजय जोगदंड, राजू पांडे, रवी केदारे, उमेश कांबळे, राजेश शेलार, रूपेश चव्हाण, हामजा हुसेन, सुरज मिश्रा, कौशिक कांबळे, आकाश वेदक, शब्बीर हुसेन आदींनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे सहायक आयुक्त मिलिंद धाट यांची भेट घेऊ न निवेदन दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महापालिका हद्दीत गेल्या पावसाळ्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, महापालिकेच्या स्थायी समितीने खड्डे बुजवण्याच्या कामासाठी १३ कोटींचा निधी मंजूर केला होता. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यूप्रकरणी रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका. तसेच जबाबदार अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदार यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आपतर्फे करण्यात आली होती. मात्र, आयुक्तांनी संबंधित कंत्राटदार, अभियंते व अधिकाऱ्यांना पाठीशी घातले. अशा घटना घडल्यास जबाबदार कोणाला धरणार, असा सवाल केला आहे.