डहाणू : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयात निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, जमदार, हवालदार असे केवळ पाच ते सहा अधिकारी, कर्मचारी असल्याने जिल्हाभरातील ग्रामीण, शहरी भागात गावठी तसेच दमण दारु विक्री करणाऱ्या टोळीला तेजीचे दिवस आले आहे. विशेष म्हणजे दमण येथून येणाऱ्या दमणदारूला सणासुदीच्या तसेच निवडणुकांच्या दिवसाला मोठी मागणी असल्याने टेम्पो किंवा पिकअप भरून अवैध दारूचा घरपोच पुरवठा होत असल्याने नागरिकांत आश्चर्य आहे.डहाणूत अनेक वर्षापासून राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कार्यालयच भाड्याच्या खोलीत आहे. येथे पालघर जिल्ह्यातील सात तालुक्यातील काळागुळ, मोह फुले, अवैध ताडी दुकाने तसेच शासनाचा महसूल बुडवून बेकायदेशीररित्या दमण दारू विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. परंतु येथे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने जिल्ह्यात बेकायदेशीर दारु विक्रीवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. डहाणू, घोलवड, बोर्डी, वानगाव, कासा, चारोटी, दापचारी, धुंदळवाडी येथे मोठ्या प्रमाणात काळा गुळ, मोह फुलांची विक्री होत आहे. परंतु दारूबंदी विभाग किंवा पोलीस प्रशासन या दुकानदारांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असते. याचे प्रमुख कारण म्हणजे, दोन्ही विभागाकडे जप्त केलेले काळा गुळ, दमणदारु, गावठी दारू हे मुद्देमाल ठेवण्यासाठी गोडाऊनच नाही. या संधीचा पुरेपूर फायदा काही घाऊक व्यापारी उठवत असल्याचे बोलले जाते. नुकतेच वानगांवच्या ऐना गावात उत्पादन शुल्क विभगााने कारवाई करून दोन लाखांचा काळागूळ जप्त केला. मात्र, हा मुद्देमाल आरोपीच्या घरातच ठेवून सील करण्यात आले.
अवैध दारु रोखण्यासाठी अबकारीकडे ५ कर्मचारी
By admin | Published: November 02, 2015 1:35 AM