कल्याण : पार्किंगच्या जुन्या वादातून एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेत व्यावसायिकाला वाचविण्याचा प्रयत्न करणारा त्याचा मुलगा जखमी झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. अन्य तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
रंजित झा या व्यावसायिकाची डोंबिवलीत फॅक्टरी आहे. त्यांचे दिव्यालाही घर आहे. त्याठिकाणी ते दररोज जात असतात. त्याठिकाणी काही दिवसांपूर्वी शरद शेट्ये या व्यक्तीचा रंजित झा यांच्यासोबत पार्किंगवरून वाद झाला होता. झा हे शुक्रवारी सायंकाळी फॅक्टरीबाहेर आले. तेथे एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. या कारमधून काही तरुण उतरले. त्यांनी रंजित यांना बेदम मारहाण करीत कारमध्ये कोंबले. त्यावेळी रंजित यांचा मुलगा त्यांच्या दिशेने त्यांना वाचविण्यासाठी धावला असता गाडी सुरू झाल्याने तो गाडीमागे फरफटत गेला. त्यात तो जखमी झाला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तपास सुरू केला असता अवघ्या चार तासांच तीन आरोपींना अटक केली. त्यातील दाेघांची शरद शेट्ये, समीर मोरे अशी नावे आहेत. या दोघांसह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य तीन जण पसार झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. व्यावसायिक झा आणि त्यांचा मुलगा खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
----------------