ठाणे : मुलीच्या लग्नाचे कर्ज झाल्यामुळे ते फेडण्यासाठी १० वर्षांच्या मुलाचे तीन लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची कबुली कल्पनाथ चौहान (५३) आणि त्याचा साथीदार भाऊ सिकंदर (४८) यांनी दिली आहे. दोघांच्याही पोलीस कोठडीत न्यायालयाने रविवारी एक दिवसाची वाढ केली.वागळे इस्टेट, हनुमाननगर भागात कल्पनाथ टीव्ही दुरुस्तीचे काम करतो. त्याच परिसरातील योगेंद्रकुमार आणि मनीषा जैस्वार यांचा १० वर्षांचा मुलगा क्रिश याचे त्यांनी चॉकलेट आणि फिरायला नेण्याच्या आमिषाने १३ जानेवारी २०१९ रोजी अपहरण केले होते. या अपहरणानंतर जैस्वार यांच्या घराच्या दारात त्याने १७ जानेवारी रोजी चिठ्ठी ठेवून तसेच फोनद्वारे खंडणीची मागणी केली. ही तीन लाखांची रक्कम कल्पनाथ याच्याकडे द्यावी, तो दादर येथे आणून देईल, असे जैस्वार यांना फोनवरून बजावण्यात आले होते. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील, दिनकर चंदनकर, सुनील पंधरकर आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण, उपनिरीक्षक अनिकेत पोटे आदींच्या पथकाने कल्पनाथ आणि सिकंदर या दोघांनाही मोठ्या कौशल्याने भिवंडीच्या एकतानगर, नारपोली येथून तीन लाखांच्या रकमेसह गुरुवारी रात्री अटक केली. सुरुवातीला दादर येथे येणार असल्याचे सांगून तो मीरा रोड येथे आल्याचे त्याने सांगितले. प्रत्यक्षात, तो रिक्षाने भिवंडीत अंजूरफाटा येथे पोहोचला होता. त्याने ठेवलेली चिठ्ठी आणि त्याच्याकडे रक्कम देण्यास अपहरणकर्त्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. त्यानंतर, त्याच्यावर पाळत ठेवून पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. सुरुवातीला दोघांनाही २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. दहा दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये गावी असलेल्या मुलीचे लग्न झाले असून त्यासाठी तीन ते चार लाखांचे कर्ज झाले. हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत असल्यानेच ओळखीतील या लहान मुलाचे अपहरण करून खंडणी उकळण्याची कल्पना सुचल्याचे पोलीस चौकशीत त्याने कबूल केले. त्याची हस्ताक्षरपडताळणी, घरझडती घेण्याची प्रक्रिया बाकी आहे. शिवाय, त्याचे आणखी कोणकोण साथीदार आहेत, या सर्वच बाबींचा तपास सुरू असल्यामुळे पोलिसांनी त्याच्या कोठडीमध्ये वाढ होण्याची मागणी न्यायालयाकडे रविवारी केली.
मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी केले अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:11 AM