उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी मालमत्ता व पाणीपट्टी कर धकबाकीधारकांना दिलासा देण्यासाठी २२ ते २६ जुलै दरम्यान अभय योजना जाहीर केली. अभय योजने अंतर्गत मालमत्ता व पाणीपट्टी करावरील १०० टक्के विलंब शुल्क माफ होणार असून नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
उल्हासनगरात एकून १ लाख ८३ हजार १३८ करमूल्य मालमत्ता असून त्यांच्याकडे ९३६ कोटी ९९ लाख ९२ हजार ४९८ रुपयांची थकबाकी आहे. एकून ९३६ कोटीची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कंबर कसली असून गेल्या आठवड्यात थकबाकीदारक १४ मालमत्ताधारकांना नोटिसा देऊन जप्तीचा इशारा दिला होता. दरम्यान विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी थकबाकी मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू करण्याची लेखी मागणी केली. अखेर आयुक्त अजीज शेख यांनी २२ ते २६ जुलै दरम्यान अभय योजना जाहीर केली. अभय योजनेमुळे मालमत्ता व पाणीपट्टीच्या एकून करावरील १०० टक्के विलंब शुल्क माफ होणार आहे. नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने आयुक्तांनी केले.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी गेल्या वर्षी दोन वेळा अभय योजना लागू केल्याने, विक्रमी १४० कोटींची मालमत्ता कर वसुली झाली होती. गेल्या वर्षीचा कित्ता गिरविण्यासाठी आयुक्तांनी अभय योजना लागू केल्याचे बोलले जात आहे. चालू वर्षी महापालिकेने १५० कोटींच्या वसुलीचे टार्गेट ठेवल्याची प्रतिक्रिया अप्रत्यक्ष अधिकारी देत आहेत. तर नागरिकांनी अभय योजनेचा फायदा घेऊन मालमत्ता कर बिल भरून शहर विकासाला हातभार लावण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले. अभय योजनेनंतर थकबाकी मालमत्ताची यादी बनवून कारवाईचे संकेत यावेळी आयुक्तांनी दिले. २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केल्याने, त्यामध्ये थकीत मालमत्ताधारक मालमत्ता कर भरून लाभ घेऊ शकतात. असे आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले.