लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/ठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांचे नाव भाजपकडून चर्चेत असताना पानसेंना उमेदवारी जाहीर झाल्याने पानसे मनसेचे की महायुतीचे उमेदवार असा पेच निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपने ही तडजोड केल्याची चर्चा आहे. शिंदेसेनाही येथून आग्रही असल्याने महायुतीतील नेते उमेदवारी मागे घ्यावी म्हणून राज यांनाच साकडे घालणार असल्याचे समजते.
महायुतीत संभ्रम
सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी उमेदवारीबाबतची घोषणा केली. त्यानंतर अभिजीत पानसे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीसाठी कामाला सुरुवात केल्याचे जाहीरही केेले. मनसेच्या या निर्णयामुळे महायुतीतच संभ्रम निर्माण झाला आहे.