ठाणे : राज्य शासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी २२ एप्रिल ते १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीत इतर आजाराने त्रस्त रुग्णांना तसेच गरजूंना योग्य ती मदत मिळावी, यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलीस आणि ठाणे पोलीस बॉइज संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या अबोली रिक्षांची फौज तैनात केली आहे. या कालावधीत या रिक्षांद्वारे मोफत सेवा पुरविली जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
लॉकडाऊन कालावधीत आजारी आणि गरजू नागरिकांना योग्य ती मदत करण्याचे निर्देश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिसांना दिले होते. गरजू रुग्णांना वेळेत वाहने उपलब्ध होत नसल्याने अनेकदा उपचारासाठी विलंब होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने ठाणे शहर वाहतूक शाखेने काही सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहनही केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणे पोलीस बॉइज संघटनेचे अध्यक्ष समीर बनसोडे यांनी अबोली रिक्षाधारकांशी समन्वय साधून लॉकडाऊन निर्बंधाची अंमलबजावणी करीत असताना नागरिकांच्या सोयीसाठी अबोली रिक्षा चालक आणि मालक यांच्या मदतीने नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेला प्रतिसाद दिला.
यामध्ये सध्या २२ महिला रिक्षाचालक सहभागी झाल्या आहेत. तरी गरजू व्यक्तींनी नितीन जंक्शन येथे सरोज पोटफोडे-८१०४४२७७७२ तसेच उषा पवार ९७०२३६५०७७ त्याचबरोबर सलोनी चव्हाण, सुप्रिया सावंत तर कॅडबरी येथे गीता पवार- अनिता इघे, राजकुमारी मुंड, वैशाली मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. कापूरबावडी ते घोडबंदर रोड- रेवती यादव, सविता पाखरे, आरती जाधव, निर्मला पवार , ज्योती मोग आणि तीन हात नाका परिसरात प्रमिला जावळे, राजश्री सावंत, जयश्री अहिरे, शालिनी पार्टे, सुनील जाधव आणि साहिल अली अहमद यांच्याशी ८६५२२७५७२६ या क्रमांकांवर आजारी व्यक्ती आणि गरजू व्यक्तींनी मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.