मीरारोड - मीरा भाईंद मधील गृहनिर्माण संस्थांना त्यांची जमीन मालकी देण्यासाठी डीम्ड कन्व्हेन्स साठी जाचक अटी टाकून केली जाणारी अडवणूक थांबवावी आणि शहरातील झोपडपट्टी वासियांचे राहणीमान उंचावण्यासाठी एसआरए योजना लागू करावी अशी विनंती आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदना द्वारे केली आहे .
सोमवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे व पालघर येथील आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी मीरा भाईंदरच्या विविध समस्या आणि विकासकामांसाठी आ. गीता यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आणि त्यावर चर्चा करण्यात आली .
शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास रखडला असून नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी शहरात एस.आर.ए. योजना लागू करण्यात यावी . गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीची मालकी मिळत नसून डीम्ड कन्व्हेन्स योजना असूनही त्यात नाहक जाचक अटी घालून नागरिकांची अडवणूक केली जात आहे . त्यामुळे अधिकाऱ्यां कडून केल्या जाणाऱ्या जाचक अटी शिथिल करून नागरिकांना इमारतीच्या जमिनीचे मालकी हक्क त्वरित द्यावेत .
मीरा भाईंदर शहरा साठी स्वतंत्र न्यायालयाची अत्यावश्यकता असून अजूनही न्यायालयाचे काम रखडले असल्याने ते तातडीने पूर्ण करून न्यायालय सुरु करण्यात यावे . शहरातील बहुतांश जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर इतर हक्कामध्ये इस्टेट इंन्वेस्टमेंट.प्रा.लि. ह्या कंपनीची नोंद करून सदर कंपनी शहरातील नागरिकां कडून झिजिया कर वसुली करून लुटत आहे . अनेक वर्षां पासून या विरोधात स्थानिक जनता संघर्ष करत असून कंपनीला सातबारा तुन हद्दपार करून नागरिकांना न्याय द्यावा .
उत्तन येथील जैवविविधता उद्यान विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा . डोंगरी चौक येथील लघु मासेमारी बंदराचा प्रस्तावित प्रकल्प विकसित करून मच्छीमारांच्या मत्स्य व्यवसायास प्रोत्साहन द्यावे . रखडलेली बी.एस.यु.पी. योजना जलद गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेस आदेशित करावे . १९ गावठण क्षेत्रांपैकी उत्तन आदी ५ गावठण क्षेत्रांची भुमापनाची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी . उर्वरित १४ विस्तारित गावठण क्षेत्रांची भूमापनाची कार्यवाही प्रस्तावीत करण्यात यावी जेणे करून स्थानिक ग्रामस्थांचा मोठा प्रश्न सुटेल .
मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही बाजूस सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी एमएमआरडीए ने कामाच्या निधीमध्ये वाढ करावी . जेणे करून शहराचा मुख्य रस्ता खड्डेमुक्त होऊन नागरिकांना दिलासा मिळेल . महानगरपालिका आस्थापनेवरील १००% पदोन्नतीने भरावयाची रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी आदेश द्यावेत . मीरारोड रेल्वे स्थानक येथून पूर्व व पश्चिम जोडणारा रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बांधण्यात यावा .
महाराष्ट्र जमीन महसूल नियम २०१९ मधील भोगवटादार वर्ग - २ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग - १ मध्ये रूपांतरित करणेची प्रभावी अंमलबजावणी पूर्ण होण्याच्या अनुषंगाने वेळापत्रक निश्चित करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत अशी विविध मागण्यांचे निवेदन आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे . ह्या बैठकीवेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक सह ठाणे व पालघर क्षेत्रातील आमदार आदी उपस्थित असल्याचे आ. गीता यांनी सांगितले .