ठाणे - ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात वीजेवर धावणाऱ्या वाहनांची मोहीम जोरात सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी १०० चार्जींग स्टेशन उभारण्यासाठी पालिकेने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आता या चार्जींग स्टेशनची शोध मोहीम पालिकेने सुरु केली आहे. या प्रक्रियेमुळे चार्जींग स्टेशन उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे. देशभरात २०३० पर्यंत वीजेवरील वाहनांची वाहतूक सुरु करण्याचे धोरण केंद्र शासनाने आखले असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात अशा वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिकेच्या निधीतून शहरात १०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार होती. मात्र, महिंद्रा आणि कायनेटीक ग्रीन या कंपन्यांनी स्टेशन उभारणीचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे महापालिका निधीतून चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने गुंडाळला असून महापालिका प्रशासन आता संबंधित कंपन्यांना चार्जींग स्टेशन उभारणीसाठी केवळ जागा उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय, संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून शहरात वीजेवरील वाहन उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांशी समन्वय साधण्याचे कामही महापालिका करणार आहे. यासंबंधीच्या सामंजस्य करारावर आयुक्त जयस्वाल यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवार आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यानंतर जानेवार पर्यंत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आता शहराच्या विविध भागात चार्जींग स्टेशन उभारण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या शहरातील पेट्रोल पंप असो किंवा सीएनजी स्टेशन असो या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या की वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. परंतु चार्जींग स्टेशन उभारतांना मात्र याची काळजी घेतली जाणार आहे. रस्त्यांवर वाहतुक कोंडी होऊ नये या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार अशा जागांचा शोध सध्या पालिकेने सुरु केला आहे. यासाठी पालिकेचे काही भुखंड यासाठी देता येऊ शकतात का? याचाही चाचपणी केली जाणार आहे. दरम्यान शहराच्या कोण कोणत्या भागात कीती चार्जींग स्टेशन असणार हे सुध्दा आता सर्व्हे नंतरच स्पष्ट होणार आहे.
ठाण्यात वीजेवर धावणाऱ्या वाहनांसाठी १०० चार्जींग स्टेशनची शोध मोहीम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 3:05 PM
वीजेवर धावणाऱ्या वाहनांच्या सामंज्यस करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आता ठाणे महापालिका आणि संबधींत संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात १०० चार्जींग स्टेशन उभारण्यासाठीच्या जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे.
ठळक मुद्देकमीत कमी जागेत चार्जींग स्टेशन उभारण्याचा मानसजानेवारीत सुरु होणार प्रकल्प