नितीन पंडित, भिवंडी : मलेशिया व दुबई येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १५ जणांना बनावट व्हिसा व बनावट विमान तिकीट देऊन ८ लाख ३० हजारांची फसवणूक केल्याची घटना भिवंडीत समोर आली आहे.या प्रकरणी चार जणांविरोधात शनिवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शांतीनगर भागातील पिराणी पाडा या भागात राहणारे टेलर व्यवसायिक तफजुल हुसैन अब्दुल मन्नार अन्सारी, वय ४३ व त्या सोबतच इतर १५ जणांना शहरातील बाग ए फिर्दोस्त या परिसरात राहणारे मोहमद फुरकान अली फारूकी अली अन्सारी,डॉ फैजान फारूकी अली अन्सारी,फारूकी अली अन्सारी व इमराना खातुन मोहमद फुरकान अन्सारी या चार जणांनी आपापसात संगनमत करून तफजुल अन्सारी व इतर १५ जणांना तुम्हाला कामासाठी परदेशात मलेशिया व दुबई येथे पाठवितो असे सांगून त्यांच्या जवळून व्हिसा व विमान तिकिटाचे ८ लाख ३० हजार रुपये घेवुन या सर्वांना बनावट व्हिजा,व मुंबई ते मलेशिया व मुंबई ते दुबई असे बनावट एअर इंडिया विमान कंपनीचे विमान तिकीट देऊन मुंबई विमानतळावर रवाना केले. परंतु विमानतळावर त्यांना आपले तिकीट रद्द झाल्याचे समजले .त्यानंतर पुन्हा आरोपींनी या सर्वांना कलकत्ता ते मलेशिया असे एअर एशिया विमान कंपनीचे बनावट टिकीट देऊन कलकत्ता विमानतळावर पाठविले.तेथे सुध्दा त्यांचे विमान तिकीट रद्द झाल्याचे समजले.
आरोपींनी तक्रारदार व इतर १५ जणांना बनावट व्हिजा व बनावट विमान तिकीट देवुन सर्वांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तफजुल अन्सारी यांनी दिलेल्या तक्रार वरून शांतीनगर पोलिसांनी मोहमद फुरकान अली फारूकी अली अन्सारी,डॉ फैजान फारूकी अली अन्सारी,फारूकी अली अन्सारी व इमराना खातुन मोहमद फुरकान अन्सारी या चौघां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.