ठाणे : प्लास्टिक बंदी कारवाईअंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात नोव्हेंबर महिनाअखेर ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कडक कारवाईमध्ये 5 .7 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, दंडापोटी 1 लाख 90 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन , वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सदर अधिसूचनांच्या अंमलबजावणीकरिता ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक करणाऱ्या संस्था, आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.
प्रदूषण नियंत्रण विभागाच्यावतीने सन 2018-19 या आर्थिक वर्षात नागरिकांकडून एकूण 20.5 प्लास्टिक संकलन करण्यात आले आहे. 72 रहिवाशी संस्था आणि सामाजिक संस्थेच्यावतीने 72 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, दंडापोटी रु.9 लाख 40 लाख एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षात नोव्हेंबर पर्यंत आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून 5.7 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. 300 रहिवाशी संस्था आणि सामाजिक संस्थेच्यावतीने 289 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दंडापोटी रु. 9 लाख 40 लाख एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
प्लास्टिकप्रमाणे थर्माकोलपासून बनविण्यात येणारी ताटे, वाट्या, कप, ग्लास यांच्या वापराचे प्रमाणही जास्त आहे. या सर्व वस्तू विघटन न होणाऱ्या असून, पर्यावरणास हानिकारक आहेत. या वस्तूची विक्री आणि वापर दोन्ही बेकायदा असून, त्याचा वापर करताना पहिल्यांदा आढळल्यास रु. 5000 /- दंड,दुसऱ्यांदा आढळल्यास रु.10,000 /- दंड आणि तिसऱ्यांदा आढळल्यास रु. 25000/- व 3 महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक व थर्माकोल बंदीची काटेकोर अंमलबजावणी करून ठाणे शहर स्वच्छ राखण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.