६ हजार कोटी इलेक्टोरल बान्ड विरुध्द सहा हजार किमी संघर्ष यात्रा; जयराम रमेश यांचे प्रतिपादन
By अजित मांडके | Published: March 16, 2024 05:12 PM2024-03-16T17:12:07+5:302024-03-16T17:15:20+5:30
भारत जोडो न्याय यात्रा ही राजकीय यात्रा नसून ती एक वैचारीक यात्रा आहे.
अजित मांडके, ठाणे : भारत जोडो न्याय यात्रा ही राजकीय यात्री नसून ती एक वैचारीक यात्रा आहे. आता पर्यंत ही यात्रा १६ राज्यातून ११० जिल्ह्यातून ६ किमी पर्यंत झाली आहे. तर भाजपने इलेक्टोरलच्या माध्यमातून ६ हजार कोटींचा पैसा गोळा केला आहे. त्यामुळे आमची लढाई ही आता ६ हजार कोटी इलेक्टोरल बॉन्ड विरुध्द सहा हजार किमी संघर्ष यात्रा अशी असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले. देशात आमचे सरकार नाही, ईडी, सीबीआय या सारख्या तपास यंत्रणा आमच्या ताब्यात नाही. तसेच वन नशेन, नो इलेक्शन चंदा दो धंदा लो अशी सत्ताधारी भाजपचे धोरण असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.
ठाण्यात भारत जोडा न्याय यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट प्रभारी रमेश चेन्नीथल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही या यात्रेच्या निमित्तीने पुढील पाच वर्षांचा जनादेश मागत आहोत, यापुढेही अशा यात्रा निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोदी गॅरेन्टी देत नाहीत, मात्र आम्ही गॅरेन्टी आणि वॉरन्टीसुध्दा देत असल्याचे त्यांनी सांगितले. आमची लढाई मोदी आणि आरएसएनच्या विरोधात असून पुढील पाच वर्षासाठी आम्ही जनादेश मागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
युवा न्याय, महिला, किसान, श्रमिक आणि हिस्सेदारी न्याय हे पाच निवडणुकीचे मुद्दे असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याच पाच मुद्यांची आम्ही वॉरन्टीसुध्दा देत असल्याचे त्यांनी सांगितले. २०१६ मध्ये आधी नोट बंदी केली आणि भाजपने आता आमची खाती बंद केली असल्याचेही ते म्हणाले. आम्ही जनतेकडून पैसे जमविले आहेत, परंतु आता ते आम्हाला खर्च करता येत नसल्याचेही ते म्हणाले. आमचे खाते फ्रीज करण्यात आले असून कॉंग्रेसला पांगळे करण्याचा कट भाजपवाले आखत असल्याची टिकाही त्यांनी केली. देशातील तपास यंत्रणांना हाताशी धरून निवडणुक रोखे च्या माध्यमातून भाजपने पैसे वसुली केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केल्याने खळबळ उडाली असून याच मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाला मिळालेल्या निवडणुक रोखेबाबत भाजप नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
त्यावर जयराम रमेश यांनी स्पष्टीकरण दिले आहे. देशात आमचे सरकार नाही. यामुळे आम्ही कुणाला कंत्राट देऊ शकत नाही. तसेच ईडी, सीबीआय या सारख्या तपास यंत्रणा आमच्या ताब्यात नाहीत. यामुळे आम्ही पैसे वसुल करत नाही, असे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विभाजनकारी असून ते धुव्रीकरणाला प्रोत्साहन देत आहेत. ते द्वेषाचे राजकारण करीत आहेत. विशेषता निवडणुक काळात ही रणनिती अवलंबली जाते. निवडणुक रोखेची प्राथमिक माहिती बाहेर आली असून याबाबत आणखी माहिती बाहेर येईल. ज्या कंपनीचा नफा २० कोटीचा आहे, त्या कंपन्या २०० कोटी रुपये निवडणुक रोखे देतात. तसेच या निवडणुक रोखे देण्यामध्ये देशातील एक कंपनी दिसून येत नाही. कारण या कंपन्या पंतप्रधान मोदी यांच्याशी संबंधित आहेत, असा आरोपही त्यांनी केला. या सरकारकडून लोकशाही कमजोर करण्याचे प्रकार सुरू असल्याचेही ते म्हणाले.