लोकमत न्यूज नेटवर्क
स्नेहा पावसकर
ठाणे : हल्ली डीएड, बीएड किंवा नुसती बीए, बीकॉम ही पदवी घेऊन नोकरी मिळतेच असे नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत टेक्निकल शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसतो. याचा परिणाम पॉलिटेक्निकच्या प्रवेशात होतो आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालयांत प्रवेशासाठी ४८३१ इतके अर्ज आले होते.
शासकीय नोकरीच्या संधी तर हल्ली नाहीच; पण कोरोनामुळे निमशासकीय नोकऱ्यांचीही हमी राहिलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत विद्यार्थी तांत्रिक अभ्यासक्रमाचे कोर्स करू लागले आहेत. या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या आधारे एखादी नोकरी नाही मिळाली तरी छोटामोठा उद्योग सुरू करता येतो. मोठा व्यवसाय नाही झाला तरी तांत्रिक शिक्षणाच्या जोरावर या काळात घरबसल्याही रोजगार तर नक्की सुरू राहू शकतो, अशी खात्री विद्यार्थ्यांना वाटते. त्यामुळे पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसतो आहे.
-------------------
मेकॅनिकल, संगणक शाखेला पसंती
गेल्या काही वर्षांत पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला विद्यार्थी जास्त प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यातही मेकॅनिकल आणि संगणक शाखेकडे अधिक विद्यार्थी वळतात. कारण हे जग यांत्रिक झाले आहे. तसेच संगणकाशिवाय सध्या पर्याय नाही. परिणामी या दोन्ही क्षेत्रांत सातत्याने क्रांती होत आहे. परिणामी यातील शिक्षण घेण्यावर विद्यार्थ्यांचा भर आहे.
------------
विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निक महाविद्यालयात कल वाढतो हे खरे आहे आणि ते विद्यार्थ्यांचा रोजगार, उत्पन्नाच्या दृष्टीनेही नक्कीच चांगले आहे. पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमात त्यांना प्रात्यक्षिकही शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थी परिपूर्ण होतात. तसेच तांत्रिक शिक्षणाची प्रत्येकाला थोडीफार माहिती असणे ही काळाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालकही या पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रवेशासाठी सकारात्मक दिसतात, असे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सांगितले.
--------------
तांत्रिक कौशल्याचा अभ्यास करून विविध उद्योगांकडे वळता येते. आधीच नोकऱ्या नाहीत, मात्र तांत्रिक शिक्षण घेतलेले असले तरी घरी छोटा व्यवसाय सुरू करता येतो, म्हणून मी पॉलिटेक्निकला प्रवेश घेते आहे.
- रुही रामेश्वरे, विद्यार्थी
----------
आता नुसती आर्टस, कॉमर्समध्ये पदवी घेऊन शासकीय नोकऱ्या नसतात; पण आता तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांसाठी अनेक विभागांत छोट्या-मोठ्या नोकरीच्या संधी असतात. पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज भरला आहे; पण आता तिथेही चुरस वाढू लागली आहे.
- दीपेश बडनाईक, विद्यार्थी.