ठाणे : राज्यात सत्तासोपानावरून शिवसेना-भाजपात जुंपली असताना इकडे ठाणे महापालिकेतही युतीत वाद रंगला आहे. यात भाजपाने शिवसेनेला लक्ष केले असून गेल्या साडेतीन महिन्यापासून महासभा न घेणाऱ्या महापौरांवर टीकास्त्र सोडले आहे. साडेतीन महिने महासभा न झाल्याने विकासकामांचे अनेक प्रस्ताव रखडल्याने त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला असून हा ठाणेकरांवर अन्याय असल्याचा आरोप केला आहे.
विधानसभा निवडणुकीची प्रक्रि या संपुष्टात आल्यानंतरही, ठाणे महापालिकेच्या महासभेची तारीख जाहीर न करणे हे न उलगडणारे कोडे आहे, अशा शब्दांत ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर शरसंधान केले आहे. महापौरांना महासभा बोलाविण्याचा अधिकार असूनही, या दिरंगाईमुळे सामान्य ठाणेकरांचे हित साधणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यांनी मंगळवारी एका पत्राद्वारे महापौरांकडे महासभा घेण्याची मागणी केली. या पत्रात गेल्या साडेतीन महिन्यांपासून महासभा घेण्यात न आल्याकडे लक्ष वेधले आहे त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये विशेष महासभा घेण्याच्या भाजपाच्या मागणीचाही उल्लेख केला आहे.
महापालिकेची शेवटची महासभा २० आॅगस्ट रोजी झाली होती. तत्पूर्वी १९ जुलै रोजीची महासभा तहकूब करण्यात आली. महासभा रखडल्यामुळे भाजपाने सप्टेंबर महिन्यात विशेष महासभा घेण्याबाबत पत्र देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत काहीही निर्णय घेण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या साडेतीन महिन्यांत महासभा घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट होते. आचारसंहितेचा काळ वगळता महासभा का घेतली नाही, हे माझ्यासह भाजपा नगरसेवकांना एक न उलगडणारे कोडे आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.२०१९-२० च्या अर्थसंकल्पातील निधीतून घेण्यात येणारी कामे अद्यापी सुरू करण्यात आलेली नाहीत. यंदाच्या आर्थिक वर्षातील सात महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला असून, संपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी दिरंगाई होण्याची शक्यता आहे. ठाणेकरांच्या दृष्टीकोनातून अनेक प्रश्न रखडले असून, सभेच्या पटलावर अनेक विषय प्रलंबित आहेत. या विषयांवर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अशा दिरंगाईमुळे सामान्य ठाणेकरांचे हित साधणारे नाही, अशा शब्दांत त्यांनी महापौरांना टोला लगावला.आचारसंहिता नसतानाही दिरंगाई : पवारविधानसभेच्या निवडणुकांची प्रक्रि या संपुष्टात आली असून, राज्यभरात आचारसंहिता उठविण्यात आली. गेल्या महिनाभराहून अधिक काळ आचारसंहितेमुळे प्रशासनावरील बंधने संपली. त्यामुळे महापालिकेचा कारभार गतिमान होण्यासाठी तातडीने महासभा घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यानंतरही ती जाहीर करण्याबाबत दिरंगाई का केली जाते, असा सवाल महापालिकेतील नारायण पवार यांनी केला.