ठाणे : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील सीतामाऊ परिसरातील कम्मो अजिज खान हा अफूवर प्रक्रिया करून घरातच हेरॉइन बनवून त्याची तस्करी करत असल्याची माहिती ठाण्याच्या अमलीपदार्थविरोधी पथकाच्या तपासात उघड झाली आहे. त्याला लवकरच मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.हेरॉइन या अमलीपदार्थाची तस्करी करणाºया सोनू शाग्गीर अहमद अन्सारी याला गुन्हे अन्वेषण विभागाने ११ आॅक्टोबर रोजी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्यापाठोपाठ त्याला हा माल पुरवणाºया गनी माऊ यालाही ठाणे पोलिसांनी १४ आॅक्टोबर रोजी मध्य प्रदेशातून अटक केली. अन्सारीकडून ३९ लाख २५ हजारांचे ३९२.५ ग्रॅम इतके हेरॉइन हस्तगत केले होते. गनीने हा माल कम्मो याच्याकडून खरेदी केल्याची माहिती आता तपासात उघड झाली आहे. तो घरातच अफूवर प्रक्रिया करून त्यातून काही रसायनांचे मिश्रण करून हेरॉनची निर्मिती करतो. तोच गनीसह अनेक घाऊक विक्रेत्यांना हेरॉइनचा पुरवठा करतो. साधारण २५ लाखांमध्ये एका किलोच्या हेरॉइनचा सौदा होतो. पुढे अडीच हजारांमध्ये एक ग्रॅम याप्रमाणे त्याची विक्री केली जाते. दरम्यान, या प्रकरणी अटकेत असलेल्या अन्सारी आणि गनी या दोघांनाही १८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ती संपल्यामुळे बुधवारी ठाणे न्यायालयाने त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात कम्मो यालाही ताब्यात घेण्यासाठी पुन्हा ठाणे पोलिसांचे पथक आता मध्य प्रदेशात रवाना होणार आहे. या प्रकरणात त्याचा नेमका सहभाग किती आहे, त्याने घरातच हेरॉइनची निर्मिती केली किंवा कसे, या सर्व बाबींची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला दिली.साधारण २५ लाखांमध्ये एक किलोच्या हेरॉइनचा सौदा करण्यात येत असे. या प्रकरणी अटक आरोपी अन्सारी आणि गनी यांना ठाणे न्यायालयाने१ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
घरातच ‘तो’ करायचा अफूवर प्रक्रिया, हेरॉइन तस्करी; तिस-या आरोपीलाही होणार लवकरच अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:19 AM