डोंबिवली - दादरप्रमाणे ठाणे स्थानकातही शुक्रवारी रात्री ११.४४ च्या सुमारास एका एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने त्या लोकलमधील प्रवाशांना थेट कळवा कारशेडमध्ये जावे लागले. त्याचा त्रास काही प्रवाशांना झाला. जागरूक प्रवाशाने ही बाब ट्विटरद्वारे रेल्वे प्रशासन आणि समाजमाध्यमातून नागरिकांसमोर आणली, त्यामुळे शनिवारी त्या घटनेबाबत समाजमाध्यमांवर चर्चा झाली, एसी लोकल हवीच कशाला इथपासून ते अशा घटना वाढल्या तर गंभीर प्रश्न निर्माण होईल, रेल्वे काय निर्णय घेणार, काय तांत्रिक खराबी होती का, असेझालेच कसे आदी प्रश्न उपस्थित केले गेले.
याबाबत मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, ती सीएसएमटी ठाणे डाऊन मार्गावर धावणारी लोकल असल्याचे समाज माध्यमांवरील चर्चेनुसार समजले, त्याबाबत माहिती मिळाल्यावर संबंधित लोकलच्या गार्डशी बोलणे झाले, त्यांनी दरवाजे उघडण्याचे बटन दाबल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या माहितीनंतर ठाणे स्थानक मॅनेजर यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी लोकल स्थानकात आल्यावर नेहमीप्रमाणे दरवाजे उघडले की नाही, तसेच प्रवासी उतरले की नाही याबाबत सीसी कॅमेरे तपासले जात आहे, त्यानुसार जी माहिती समोर येईल ती वरिष्ठ पातळीवर सांगितली जाईल असे सुतार यांनी स्पष्ट केले.