काय आहे नेमके प्रकरण
महापालिका शाळेची जागा हब्बीउल्ला ट्रस्टच्या नावावर होती. या ट्रस्टकडून ठाणे नगर परिषदेने ती विकत घेतली. तिचे पूर्ण पैसे दिलेले नसल्यामुळे जागेचा सातबारा महापालिकेच्या नावावर झालेला नव्हता. त्यातही काही वर्षांपूर्वी येथे असलेली महापालिकेची शाळा धोकादायक झाल्याने शाळेची इमारत पाडण्यात आली. गेली ४२ वर्षे ही जागा महापालिकेच्या ताब्यात असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. हब्बीउल्ला ट्रस्टने महापालिकेला डावलून इतर विकासकासोबत करार करून सातबारा नावावर करून घेतल्याचे महासभेत नगरसेवकांनी सांगितले. या जागेबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा झाली आहे. ती आजही महापालिकेच्या ताब्यात आहे. तिचा फेरफार रद्द करून कोर्टात याचिका दाखल करणे, ही प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा सुरू आहे. परंतु एवढे करूनही ही जागा मिळणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.