लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला मुभा मिळणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, नियोजनाअभावी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरणाचा वेग वाढवा अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी शक्यता डोंबिवली शिवसेना शहर शाखेने व्यक्त केली आहे.
शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, तात्या माने, सतीश मोडक आदींनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. जानेवारीत लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत केवळ एक लाख ५२ हजार नागरिकांनाच दोन डोस मिळाले आहेत. मनपाचे १३ लाख ५९ हजार नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने धिम्या गतीने लसीकरण सुरू आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होते. तेथे रांगेत ऑफलाइन पद्धतीने लस घेण्यासाठी हजारो नागरिक उभे असतात. परंतु, अनेकांना लसीविनाच घरी परतावे लागते. अनेक नागरिक मध्यरात्री १२ पासून रांगेत उभे राहतात. वृद्धांना रांगेत उभे राहता येत नसल्याने त्यांची मुले, सुना, नातवंडे रांग लावतात. अनेक जण सुटी घेऊन लस घेण्यासाठी येतात. रांगेत उभे राहून चक्कर येऊन पडल्याचे प्रकार घडले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, दुसऱ्या डोसअभावी अनेक जण लोकल प्रवासापासून वंचित राहाणार आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवा, जास्त डोस उपलब्ध करून द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
---