ठाणे : 'समता संस्कार म्हणजेच भारताच्या संविधानाचा मनोमन अंगीकार. संविधानाने प्रत्येक नागरिकाला धर्म, लिंग, जात, भाषा, रंग याच्या पलीकडे जाऊन समानतेचे अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचा सन्मान करून आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आणि समाजात वावरताना त्यांचा अंगीकार करण्याची शिकवण या शिबिरात दिली जाते' अशा शब्दात प्रा. प्रवीण देशमुख या व्ही. जे. टी. आय. या सुप्रसिद्ध अभियांत्रिकी कॉलेज मधे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत व मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे प्रा. प्रवीण देशमुखांनी समता शिबिराचे उदघाटन करतांना सांगितले.
'व्यक्तिमत्व विकासामध्ये आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, जिद्द, धडाडी, चिकाटी,मेहनत, नीटनेटकेपणा,स्वच्छता, ठोस देहबोली या गुणांबरोबरीने समाजाप्रती प्रेमभाव, वैज्ञानिक दृष्टीकोण, दुसर्याचे ऐकून घेण्याची तयारी, आचार विचारात सकारात्मकता, समर्पणाची भावना, समूहात काम करण्याची क्षमता या अतिशय महत्वाच्या मूल्यांचा परिचय या मुलांना देण्यात येतो. यामुळे मुलांच्या आयुष्याला दिशा मिळते. त्यांच्या विचारांना संस्कारीत केले जाते. ४ दिवस चालणार्या या शिबिराने मुलांच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते', असं ते पुढे म्हणाले.
ठाण्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या समता विचार प्रसारक संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांच्या सामाजिक जाणिवा जागृत करण्याच्या हेतूने विनामूल्य ‘समता संस्कार शिबिराचे’आयोजन करण्यात आले आहे. रविवार 15 एप्रिल रोजी येऊर येथील जंगल कॅम्प येथे या २६व्या शिबिराचे उद्घाटन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रवीण देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि‘समता विचार प्रसारक संस्थेचे’ अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ होते. 'आत्मसन्मानासाठीचे आत्मभान, वैचारिक स्पष्टता, समाजाप्रती प्रेमभाव व समर्पण या सा-या मूल्यांचा परिचय व अंगीकार यांचे बीज रोवणारे हे शिबिर. तुमच्या आयुष्याला बदलून टाकू शकणार् एक हॅपनींग!' असे संजय सर मूहणाले. जोशी मॅडम यांनी संस्थेने नव्याने सुरूवात केलेल्या एकलव्य सक्षमीकरण योजनेची माहीती दिली. लतिका सु. मो. यांनी शिबिरातील शिस्त, नियमावली व थोडी थोडी दंगामस्ती याबाबत मार्गदर्शन केले. हर्षलता कदम व कल्पना भांडारकर यांनी सर्वांचे स्वागत केले. शिबिर संयोजक अजय भोसलेने प्रास्ताविक तर दुर्गा माळीने आभार प्रदर्शन केले.
१९ एप्रिलला शिबिर समारोपाला ठाणेकरांना निमंत्रण!
या वर्षी ठाण्यातील विविध वस्त्यांमधील २३ मुले व २९ मुली असे ५२ शिबिरार्थी शिबिरात सामील झाले आहेत. शिबीर संयोजक अजय भोसले, शिबीर व्यवस्थापक सुनील दिवेकर, महिला शिबीर व्यवस्थापक सीमा श्रीवास्तव यांच्या बरोबर ८ पूर्ण वेळ कार्यकर्ते शिबिरात कार्यरत आहेत. उद्घाटनाला जंगल कॅम्पच्या सुनीता मॅडम, संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया, संस्थेतर्फे नव्याने सुरू झालेल्या एकलव्य सक्षमीकरण योजनेच्या मुख्य संयोजक मनीषा जोशी, संस्थेच्या उपाध्यक्ष कल्पना भांडारकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लतिका सु.मो., हर्षलता कदम, सुरेखा देशमुख, ठाणे महापालिकेचे क्षीरसागर सर आदि मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनच्या दिवशी नाशिक येथील प्रशांत केळकर यांनी मुलांना हसत खेळत शारीरिक अवयवांची माहिती दिली आणि मुले एकदम मोकळी होऊन गेली. संध्याकाळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी अनेक प्रयोगांच्या आधाराने अंधश्रद्धेच्या विरोधात मुलांना मार्गदर्शन केले. सोमवारी १६ तारखेला आसावरी जोशी यांची हस्तकलेतील मुलांना शिकता येईल. मंगळवारी १७ तारखेला राजेंद्र बहाळकर व शिल्पा रेडीज 'अभ्यास कसा करावा' यावर तर हर्षदा बोरकर 'कला आणि व्यक्तिमत्व' यावर बोलणार आहेत. बुधवारी १८ तारखेला ऋतेश पंडितराव, अभय घाडगे, गीत नाईक 'खेलमेल' या सत्रात खेळांमधून समताशिकवतील तर संध्याकाळी जंगल भ्रमंती, संपर्क खेळ व स्त्री पुरूष समता वर चर्चा होईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांचीएकलव्यांनी घेतलेली मुलाखत हे शिबिरात खास आकर्षण असेल. गुरुवारी १९ ला समारोपाच्या दिवशी आय.पी.एच च्या सुरभि नाईक युवकांचे प्रश्न यावर मार्गदर्शन करतील. संस्थेच्या हितचिंतकांनी गुरुवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शिबिरात समारोपाच्या कार्यक्रमासाठी अवश्य यावे असे जाहीर निमंत्रण संस्थेतर्फे सचिव राहूल सोनार यांनी केले आहे. समारोपाला राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय सचिव सिरत सातपुते यांना आमंत्रित केले आहे.